परभणी जिल्ह्यात तीन गावांसाठी २५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:48 PM2017-12-12T23:48:51+5:302017-12-12T23:49:48+5:30
अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना २५ लाखांच्या निधी खर्चास राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे़
ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक बहुल भागाचा विकास व्हावा, तेथे मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येतो. या अंतर्गत खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येतो़ परभणी तालुक्यातून पेगरगव्हाण, तरोडा येथे अल्पसंख्यांक वस्तीतील सिमेंट रस्ता कामासाठी निधीस मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता़ तसेच गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील नवी अबादी कॉलनीमध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा़, असा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला होता़ या प्रस्तावांना शासनाने ११ डिसेंबर रोजी मंजुरी दिली असून, पेगरगव्हाण व तरोडा येथील कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये तर राणीसावरगाव येथील कामासाठी ५ लाख रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे़ यामुळे विकास कामे मार्गी लागणार आहेत़
बदल करण्याचे : अधिकार जिल्हाधिकाºयांना
मंजूर करण्यात आलेल्या ठिकाणी इतर योजनेतून कामे करण्यात आलेली नाहीत, याची शहानिशा व खातरजमा जिल्हाधिकारी यांना करावी लागणार आहे़ तसेच या ठिकाणी इतर योजनेतून कामे मंजूर झाल्यास त्या बदल्यात इतर काम मंजूर निधीच्या मर्यादेत राहून बदल करण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत़ कामाच्या बदल्यात इतर काम करणे शक्य नसल्यास वितरित केलेला निधी शासनाला जमा करावा लागणार आहे़ तसेच या कामाचे अंदाजपत्रक सा़बां़ विभागाकडून घेऊन अटी व शर्तीनुसार कारवाईनंतर जिल्हा परिषदेकडे निधी सुपूर्द करण्यात येणार आहे़ मंजूर झालेला निधी त्याच कामासाठी ग्रामपंचायतींना वापरावा लागणार आहे़