परभणीत शालेय पोषण आहारचा २५७ क्विंटल तांदूळसाठा जप्त
By राजन मगरुळकर | Published: September 20, 2022 04:08 PM2022-09-20T16:08:04+5:302022-09-20T16:08:26+5:30
परभणीत स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
परभणी : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळाचा साठा करून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या साठेबाजांवर पोलीसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली आहे. सोमवारी परभणीतील गडी मोहल्ला येथील कारवाईत पथकाने २५७ क्विंटल राशन तांदूळ जप्त केला आहे.
या प्रकरणी नानलपेठ ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सोमवारी नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना परिसरातील गडी मोहल्ला, आझाद कॉर्नर परिसरातील गोदामात स्वस्त धान्य दुकानातील राशन तांदूळाचा साठा करण्यात आल्याची माहिती पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापा मारला. यावेळी गोदामात ५१२ पोत्यात तांदूळ आढळून आला. पथकाने ३ लाख ८६ हजार ९२५ रूपयांचा २५७.९५ क्विंटल तांदूळ जप्त केला. याचबरोबर २९ हजार २६० रूपयांचे रिकामे पोते, पोते शिवण्यासाठीची मशीन, प्लेट काटा आदी साहित्य आणि ९४ हजार ५०० रूपयांचे शालेय पोषण आहारातील मुगदाळ व वटाणे यांचे एकूण ७० पोते असा एकूण ५ लाख १० हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोघांना घेतले ताब्यात
या प्रकरणी चार आरोपींवर अत्यावश्यक वस्तु अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शेख मतीन शेख रशीद, अब्दुल अजीज अब्दुल रशीद यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सुधाकर चौरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, साईनाथ पुयड, विलास सातपुते, रवी जाधव, दिलावर खान, मोबीन, परसोडे, खुपसे, गायकवाड, ढवळे, आव्हाड यांच्या पथकाने केली.