बनावट प्रमाणपत्राद्वारे २५८ जणांनी मिळविली नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:20+5:302021-01-16T04:20:20+5:30
परभणी : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्राप्त करून त्याद्वारे खेळाडूंसाठी राखीव असलेल्या कोट्यातून राज्यातील २५८ जणांनी नोकरी मिळविल्याचे समोर आले ...
परभणी : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्राप्त करून त्याद्वारे खेळाडूंसाठी राखीव असलेल्या कोट्यातून राज्यातील २५८ जणांनी नोकरी मिळविल्याचे समोर आले असून, या प्रकरणी क्रीडा व युवक सेवा विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारे यांनी लेखी स्वरुपात दिली. या बाबत आ. बाबाजानी दुर्राणी यांनी तक्रार केली होती.
परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध विभागांत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धक विजेत्या खेळाडूंना नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अनेकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविली आहे. औरंगाबाद येथील क्रीडा उपसंचालकांनी या संदर्भातील अहवाल सादर केला आहे. त्यामुळे या अहवालाच्या अनुषंगाने काय कारवाई करण्यात आली, संबंधितांना शासकीय सेवेतून कमी केले का, असा सवाल करणारे पत्र आ. बाबाजानी दुर्राणी यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना दिले होते. त्या अनुषंगाने केदार यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ट्रॅम्पोलिन व तबलिंग या खेळ प्रकारात राज्यात २५८ जणांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे.
याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. या २५८ बोगस खेळाडूंचे नियुक्तीपत्र रद्द करून प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी नियुक्ती प्राधिकरणास सुचित करण्याचे निर्देश क्रीडा उपसंचालकांना दिले आहेत व या प्रकरणी कारवाई सुरू असल्याचे केदार यांनी आ. दुर्राणी यांना दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
त्यामुळे या प्रकरणी संबंधितांची बरखास्ती कधी होते, याकडे लक्ष लागले आहे.