सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:56+5:302021-03-07T04:16:56+5:30
परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद ...
परभणी : मागील सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, सध्या ११७ रुग्णच उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यामुळे उर्वरित रुग्ण गेले कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण केले जात आहे. मात्र मागील सहा दिवसांतील रुग्णांची संख्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता, सहा दिवसांत २९२ नवीन रुग्ण नोंद होत असतील, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यात केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे उर्वरित १७५ रुग्ण गेले कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र नव्याने नोंद झालेल्या रुग्णांना १४ दिवसांनंतर कोरोनामुक्त जाहीर केले जाते. त्यामुळे सहा दिवसांत जर २९२ नवीन रुग्णांची नोंद होत असेल, तर चौदा दिवसांचा कालावधी संपलेला नसताना रुग्णांची संख्या घटली कशी? असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी दाखविली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे.
सहा दिवसांत ३६४ रुग्ण कोरोनामुक्त
मागील सहा दिवसांच्या काळात तब्बल ३६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाच्या अहवालानुसार १ मार्च रोजी १५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत होते. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत गेली. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक राहिली. ३ मार्च रोजी सर्वाधिक ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे १ मार्च रोजी ६८, २ रोजी ४३, ४ मार्च रोजी ६४, ५ रोजी ४५ आणि ६ मार्च रोजी ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
१४ दिवसांनी होते रुग्णांची सुटी
एखाद्या रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्यावर १४ दिवस उपचार केले जातात. या काळात त्याची दोनवेळा पुन्हा कोरोना चाचणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यास कोरोनामुक्त ठरविले जाते. मात्र जिल्ह्यात सहा दिवसांत २९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे १ ते६ मार्च या कालावधीतील १४ दिवसांच्या टप्प्यात हे रुग्ण कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या यादीत ६ मार्च रोजीच्या यादीतच केवळ ११७ रुग्ण उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.