परभणीत ९४ केंद्रांवर २९ हजार ९४३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:46 PM2019-02-28T18:46:22+5:302019-02-28T18:46:56+5:30
कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्रावर १ अशा ९४ बैठे पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परभणी: जिल्ह्यातील ९४ केंद्रांवर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. जिल्हाभरातील २९ हजार ९४३ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून या परीक्षेची शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांसाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली असून परीक्षा केंद्रांसह बैठे पथक आणि भरारी पथकांचीही तयारी करण्यात आली आहे. परभणी तालुक्यामध्ये ३६ केंद्रावर ११ हजार २८६ विद्यार्थी परीक्षा देतील. पूर्णा तालुक्यात ११ केंद्रावर २ हजार ८४, गंगाखेड तालुक्यात १२ केंद्रावर ३ हजार ७०३, पालम तालुक्यात ५ केंद्रांवर १ हजार ३१९, सोनपेठ तालुक्यात ४ केंद्रावर २६१, जिंतूर तालुक्यात १२ केंद्रावर ४ हजार ४७५, पाथरी तालुक्यात ५ केंद्रावर २ हजार २६९, मानवत तालुक्यात ३ केंद्रावर १ हजार २३५ आणि सेलू तालुक्यातील ६ परीक्षा केंद्रावर २ हजार ५११ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पहिला पेपर होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षा केंद्रावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
९४ पथकांची स्थापना
दहावीच्या परीक्षा काळामध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्रावर १ अशा ९४ बैठे पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पथकात प्रत्येकी ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय महसूल प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे ३३ भरारी पथकेही परीक्षा काळात कॉपीला आळा घालण्यासाठी विविध केंद्रांना भेटी देणार आहेत.