गंगाखेड तालुक्यात आढळले ३ कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:40+5:302021-02-23T04:25:40+5:30
गतवर्षी तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सातशेपेक्षा अधिक रुग्णांना कोरोना रुग्णालयात उपचार करून कोरोनामुक्त करण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित झालेले ...
गतवर्षी तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सातशेपेक्षा अधिक रुग्णांना कोरोना रुग्णालयात उपचार करून कोरोनामुक्त करण्यात आले. यामध्ये कोरोनाबाधित झालेले २० पेक्षा अधिक रुग्ण परभणी, नांदेड, औरंगाबाद येथील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले. कोरोना विषाणूंची बाधा झालेल्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यास गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आरोग्य प्रशासनाला यश आले. त्यानंतरही जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. असे असले तरी गंगाखेड तालुक्यात स्थानिक पातळीवर कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळला नसल्याने सर्व काही सुरळीत सुरू असतानाच १४ फेब्रुवारी रोजी गंगाखेड शहरातील ४० वर्षीय पुरुषाला तसेच वसतिगृहात जाण्यासाठीची तयारी म्हणून कोरोना तपासणी करणाऱ्या तालुक्यातील बनपिंपळा येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. तर महाविद्यालय सुरू झाल्याने महाविद्यालयात जाण्यासाठी तालुक्यातील रुमना येथील २२ वर्षीय विद्यार्थ्याने कोरोना तपासणी केली असता १९ फेब्रुवारी रोजी त्याचाही अहवाल कोरोनाबाधित आला. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन झाली. या तिन्ही रुग्णांना होम आयसोलेशन करून त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांची कोरोना तपासणी करून क्वारंटाइन करण्यात आले आहे.
त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेलेले संपूर्ण वर्ष लॉकडाऊन व संचारबंदीचा सामना करण्यात गेले. तसेच गेल्या आठवड्यात तालुक्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व सद्य:स्थितीत शहरासह तालुक्यातील गावात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन न करता बाजारपेठ, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे व वेळोवेळी हात स्वच्छ धुऊन सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी केले आहे.