परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 02:39 PM2020-07-12T14:39:49+5:302020-07-12T14:40:26+5:30
१२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
परभणी: गंगाखेड शहरात एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने निर्णय घेत परभणी जिल्ह्यामध्ये १२ जुलै रात्री १२ वाजेपासून ते १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर रुग्णसंख्या अधिक असलेल्या गंगाखेड तालुक्यात १९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. यापूर्वी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेपासून ते १२ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच आता परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना आणखी तीन दिवस आणि गंगाखेडकरांना ८ दिवस लॉकडाऊन करावे लागणार आहे. या संचारबंदी काळात नेहमीप्रमाणेच सर्व शासकीय कार्यालय, त्यांची वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, आपद्कालीन सेवा, अन्न वाटप करणारे वाहने, अत्यावश्यक परवाने घेतलेली व्यक्ती, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वार्ताहर, प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस वितरक कर्मचाºयांना सूट राहणार आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ या काळात घरोघर जावून दुध विक्री करता येईल. केवळ राष्ट्रीयकृत बँका सुरु राहतील. त्यादेखील रास्तभाव दुकानदार,पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक व महावितरण कंपनीकडून येणारे चलन स्वीकारणार आहे.
आतापर्यंतची संचारबंदी नावालाच
या महिन्यात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा संचारबंदी लावण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र या काळातील अनुभव पाहता केवळ कागदोपत्रीच संचारबंदीचा अंमल होत असून प्रत्यक्षात बाजारपेठा बंद आणि रस्त्यावर वर्दळ सुरु अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी स्वत:हून घराबाहेर पडू नये, असे अपेक्षित असले तरी नियम झुगारुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातही मागील संचारबंदी काळात एकाही प्रशासकीय यंत्रणेने घराबाहेर पडलेल्या नागरिकाला तो घराबाहेर का आला ? खरेच त्याचे अत्यावश्यक काम आहे का? याविषयी विचारपूस केली नाही. अंमलबजावणी करणारी यंत्रणाच गायब असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा कोणताही थाट नागरिकांना नव्हता. परिणामी संचारबंदीतही बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मुक्त संचार दिसून आला. त्यामुळे अशा संचारबंदीने कोरोनाचा फैलाव थांबला जाईल का? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करताना त्याची तेवढीच काटेकोर अंमलबजावणीही केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.