स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तरुणाचे ३ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 07:15 PM2020-08-24T19:15:50+5:302020-08-24T19:17:18+5:30
नातेवाईकांकडे जुन्या घरात सोने सापडले आहे. तू पैश्याची व्यवस्था केलीस तर कमी भावात मिळेल असे आमिष दिले
सोनपेठ : तालुक्यातील शिर्शी येथे हिंगोली येथील एका व्यक्तीला स्वस्तात सोने देतो म्हणून बोलावून त्याच्या जवळील तीन लाख रुपये लुटल्याची घटना रविवारी ( दि. २३ ) घडली.
हिंगोली येथील आकाश रतनलाल कुरील ( २५ ) याची घाटकोपर येथील संतोष सोबत परभणी येथे ओळख झाली. तेव्हापासून आकाश व संतोष एकमेकाच्या संपर्कात होते. एक महिन्यापूर्वी संतोषाने सोनपेठ येथील माझ्या नातेवाईकांकडे जुन्या घरात सोने सापडले आहे. तू पैश्याची व्यवस्था केलीस तर कमी भावात मिळेल असे सांगितले. त्यानंतर तीन लाख रुपये घेऊन आकाश व त्याचा भाऊ रविवारी सोनपेठ येथे आले. संतोषने आकाशला शिरसी गावातील नदीच्या पुलावर ये असे सांगितले. तेथे थांबल्यानंतर दुचाकीवरील दोघांनी, तुम्हाला संतोषने पाठवले आहे का असे विचारत आमच्या पाठीमागे या असे सांगितले.
काही अंतरावर थांबल्यास त्यांनी आकाशला पैसे आणले आहेत का असे विचारले. आकाशने पैशाची बॅग दाखवताच त्यांनी काही सोनेरी नाणी दाखवली. आकाशने नाणी हातात घेऊन पाहिली असता ती खोटी असल्याची त्याला कळले. यामुळे आकाशने सोने घेण्यास नकार दिला असता त्यांनी दोघा भावांना मारहाण करत पैसे लुटून नेले. या प्रकरणी आकाश कुरीलच्या फिर्यादीवरून संतोष व इतर दोघांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक गजानन भातलवंडे हे करत आहेत.