परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ
By राजन मगरुळकर | Published: June 26, 2024 04:02 PM2024-06-26T16:02:20+5:302024-06-26T16:04:11+5:30
एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे.
परभणी : शहर महापालिकेमार्फत सन २०२४-२५ या वर्षाकरिता मालमत्ता कराचे मागणी बिल वाटप सुरू आहे. यामध्ये जे मालमत्ता धारक एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करतील, अशा मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. या आर्थिक वर्षात बुधवारपर्यंत एकूण तीन हजार ३०० मालमत्ताधारकांनी या पाच टक्के सूट योजनेचा लाभ घेतला आहे. सदर योजनेसाठी अजून तीन दिवस बाकी आहेत.
शहरातील मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या मालमत्ता कराचे मागणी बिल पत्रक वाटप केले जात आहे. शहरात जवळपास ७५ हजारहून अधिक मालमत्ता धारक आहेत. एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षात आजपर्यंत तीन हजार मालमत्ता धारकांनी सदरील वर्षभराची रक्कम अदा करून या सूट योजनेचा लाभ घेतला आहे. आता गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे शेवटचे तीन दिवस योजनेसाठी बाकी आहेत.
याद्वारेही करू शकता कराचा भरणा
मालमत्ता करासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर मालमत्ता कराची इ-मागणी बिल व ते भरण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन लिंक परभणी एमसीडॉटओआरजीवर जाऊन विविध पर्यायद्वारे तसेच मागणी बिलावरील क्यूआरकोडचा वापर करून आणि एसएमएसद्वारे आलेल्या लिंकचा वापर करून सदरील रक्कम भरणा करावी. याशिवाय महापालिकेचे वसुली लिपिक प्रभाग समिती येथील कॅश काउंटरवर सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मनपाचे आवाहन
मालमत्ता कर भरण्यासाठीच्या सुविधा सुविधाचा लाभ घेऊन ३० जूनपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करून चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सुट्टीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.