परभणीत ३० लाखांची रोकड जप्त; हवालाचा संशय, दोन जण ताब्यात
By राजन मगरुळकर | Published: July 17, 2022 05:56 PM2022-07-17T17:56:51+5:302022-07-17T17:57:05+5:30
अनधिकृतपणे काही रक्कम बाहेर जिल्ह्यात जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यावरून नारायण चाळ परिसरात दोन संशयितांना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.
परभणी : अनधिकृतपणे काही रक्कम बाहेर जिल्ह्यात जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यावरून नारायण चाळ परिसरात दोन संशयितांना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. या संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी २९ लाख ८५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. सदरील कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने केली. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलीसांना आहे.
परभणी शहरातून अनधिकृतपणे काही रक्कम बाहेर जिल्ह्यात जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, कर्मचारी शेख ताजुद्दीन, सय्यद वाजेद यांच्या पथकाने शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नारायण चाळ परिसरात सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ २९ लाख ८५ हजार २०० रुपयांची रोकड आढळून आली. सदर रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिस पथकाला आहे.
सापडलेल्या रकमेविषयी अधिक माहितीसाठी आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडे पुढील पत्रव्यवहार केला जाणार आहे. ब्लॅक मनी किंवा मनी लॉन्ड्रींगचा प्रकार आहे का ? याचा तपास सुरू आहे. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. - अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक.