११ महिन्यांत गौण खनिजाचे ३३ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:35+5:302021-03-22T04:15:35+5:30

गंगाखेड : येथील महसूल विभागाने एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ३३ ...

33 vehicles of minor minerals seized in 11 months | ११ महिन्यांत गौण खनिजाचे ३३ वाहने जप्त

११ महिन्यांत गौण खनिजाचे ३३ वाहने जप्त

Next

गंगाखेड : येथील महसूल विभागाने एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ३३ वाहने जप्त केली. या वाहनमालकांना ३७ लाख ९५ हजार ७८ रुपयांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध गौण खनिजाची वाहतूक सुसाट होत असल्याचे दिसून येत आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी ही वाळू पट्ट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये वाळूमाफियांनी आनंदवाडी, गौंडगाव, धारासूर, मैराळ सावंगी, गंगाखेड शहर आदी ठिकाणांवरून बेसुमार वाळू उपसा केला. वाळू उपसा करून नदीकाठावर त्याचे साठे निर्माण केले. गरजेनुसार या साठ्यातून वाळूची टिप्पर, ट्रक, हायवाच्या माध्यमातून वाहतूक करून संबंधितांपर्यंत अवैध मार्गाने ही पोहोचती केली. दररोज बेसुमार वाळूची व दगड, माती व मुरमाच्या होत असलेल्या अवैध वाहतुकीबद्दल नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर थातूरमातूर कारवाई करून पोलीस व महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांना रान मोकळे सोडले. एप्रिल २०२० ते १५ मार्च २०२१ या ११ महिन्यांच्या कालावधीत हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरचा हेड असे ३३ वाहने अवैध गौण खनिजाची वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केली. विशेष म्हणजे या वाहनमालकांना महसूल प्रशासनाच्या वतीने ३७ लाख ९५ हजार ७८ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एकीकडे दररोज २०० हून अधिक वाहनांद्वारे अवैध वाळू, मुरूम व मातीची वाहतूक केली जात असताना दुसरीकडे मात्र थातूरमातूर कारवाया करीत ११ महिन्यांत केवळ ३३ वाहने जप्त करण्याची किमया महसूल प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात साधली आहे.

केवळ २१ लाखांचा दंड वसूल

अवैध गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी ११ महिन्यांत महसूल प्रशासनाने केवळ ११ वाहने जप्त केली. विशेष म्हणजे या वाहनांना ठोठावण्यात आलेला ३७ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वेळेत वसूल करणे अपेक्षित होते. मात्र महसूल प्रशासनाला हा दंडही वसूल करता आला नाही. ठोठावलेल्या दंडापैकी केवळ २० लाख ८२ हजार ६८५ रुपयांचाच दंड वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना तालुका महसूल प्रशासन मात्र अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: 33 vehicles of minor minerals seized in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.