जिंतूरात ३४ कोटींच्या कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:55+5:302020-12-16T04:32:55+5:30
जिंतूर तालुक्यामध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून समजल्या जाते. मागच्या दोन वर्षापासून कापसाच्या पेऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, ...
जिंतूर तालुक्यामध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून समजल्या जाते. मागच्या दोन वर्षापासून कापसाच्या पेऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, खासगी बाजारपेठेमध्ये कापसाला म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. सीसीआयमार्फत शासनाची कापूस खरेदी सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा भाव मिळत आहे. जिंतूर येथे २३ नोव्हेंबरपासून सीसीआयमार्फत कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये सतनाम ट्रेडिंग कंपनीने १७ हजार ४३१ क्विंटल कापूस ९ कोटी ५८ लाख ७० हजार, विकास उद्योगाने १७ हजार ७२६ क्विंटल कापूस, ९ कोटी ७४ लाख ७३ हजार, रमन ॲग्रोने १० हजार ६६३ क्विंटल कापूस, ५ कोटी ८६ लाख ४२ हजार, वर्धमान जिनिंग ७ हजार ५९५ कापूस, ४ कोटी १७ लाख ७२ हजार, राधिका जिनिंग ४ हजार ८७४ क्विंटल कापूस २ कोटी ६८ लाख ७ हजार रुपये किमतीचा खरेदी केला आहे . सीसीआयने २४ दिवसात ५८ हजार २९१ क्विंटल कापूस ३२ कोटी ६ लाख ५०० रुपयांचा खरेदी केला असून खासगी बाजारपेठेत वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी ६ हजार ४६४ क्विंटल २ कोटी ९० लाख रुपयांचा कापूस खरेदी केला आहे. सीसीआयकडून कापसाला ५५०० ते ५७०० पर्यंत भाव देत आहे. तर खासगी बाजारपेठेत हेच भाव ४५०० रुपयांपर्यंत आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्याकडील स्वच्छ प्रतीचा कापूस जिंतूर सीसीआयकडे विक्रीसाठी आणावा. दररोज २०० ते २५० वाहनाचे मोजमाप होत आहेत. शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मनोज थिटे, मुख्य प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिंतूर.