परभणीत जिल्हा पोलिस दलाच्या लेखी परीक्षेसाठी ३७२ चालक तात्पुरते पात्र

By राजन मगरुळकर | Published: July 15, 2024 06:07 PM2024-07-15T18:07:29+5:302024-07-15T18:08:20+5:30

जिल्हा पोलिस दलाची शिपाई चालक भरती प्रक्रिया 

372 drivers provisionally eligible for Parbhanit District Police Force written test | परभणीत जिल्हा पोलिस दलाच्या लेखी परीक्षेसाठी ३७२ चालक तात्पुरते पात्र

परभणीत जिल्हा पोलिस दलाच्या लेखी परीक्षेसाठी ३७२ चालक तात्पुरते पात्र

परभणी : पोलिस चालक आणि शिपाई या दोन्ही पदांच्या शारीरिक चाचणी प्रक्रिया झाल्यावर चालक पदासाठी वाहन चाचणी परीक्षा शनिवारपर्यंत बीड येथे घेण्यात आली. या प्रक्रियेमध्ये एकूण ५५४ उमेदवारांना चाचणीकरिता बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३७२ उमेदवार हे पुढील लेखी परीक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पात्र ठरले आहेत.

जिल्हा पोलीस दलातील पोलीस चालक आणि शिपाई अशा दोन्ही पदांच्या मिळून १४१ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात शारीरिक चाचणी प्रक्रियेत शिपाई पदासाठी ३४९५ तर चालक पदासाठी २५३८ उमेदवार हजर होते. त्यातील पोलिस शिपाई पदासाठी एकास दहा प्रमाणे ११२९ उमेदवार पात्र झाले आहेत. शारीरिक चाचणी प्रक्रियेनंतर बीड येथे नऊ ते १३ जुलैपर्यंत उमेदवारांची वाहन चाचणी परीक्षा घेण्यात आली. या वाहन चाचणी परीक्षेमध्ये एकूण ५५४ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५१७ उमेदवार प्रत्यक्ष हजर होते तर ३७ उमेदवार गैरहजर होते. त्यामध्ये ३७२ उमेदवार हे पुढील लेखी परीक्षा प्रक्रियेस पात्र ठरले आहेत. यामध्ये १२ महिला आणि ३६० पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.

सर्व उमेदवार लागले तयारीला
लेखी परीक्षा पुढील वेळापत्रकानुसार होणार आहे. त्यानुसार शारीरिक चाचणी आणि वाहन चाचणी प्रक्रियेत सहभागी होऊन पुढील प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून लेखी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. भावी पोलिसांचे स्वप्न लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर सर्व गुणांच्या आधारावर पूर्ण होणार आहे.

Web Title: 372 drivers provisionally eligible for Parbhanit District Police Force written test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.