शौचालय साहित्यापोटी दिले चार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:12 AM2017-08-01T00:12:03+5:302017-08-01T00:12:03+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना वैयक्तीक शौचालय उभारणीचे साहित्य दिल्याच्या मोबदल्यात ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरून वितरित करण्यात आला असून, आणखी १ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपयांचा निधी संबंधितांना देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांना वैयक्तीक शौचालय उभारणीचे साहित्य दिल्याच्या मोबदल्यात ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचा निधी पंचायत समितीस्तरावरून वितरित करण्यात आला असून, आणखी १ कोटी ७७ लाख ४५ हजार रुपयांचा निधी संबंधितांना देणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली़
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालय उभारणीसाठी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदानाची रक्कम देण्याचे शासनाचे आदेश आहेत़ परभणी जिल्हा परिषदेने मात्र वेगळाच पायंडा पाडत प्रत्येक लाभार्थ्याला ५ हजार रुपये अगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेतला़ असे असले तरी सदरील रक्कम थेट लाभार्थ्यांना देण्याऐवजी ती खाजगी दुकानदारांना देवून संबंधित दुकानदारांकडून त्या रकमेचे साहित्य लाभार्थ्यांना देण्याची पद्धत पंचायत समितीस्तरावर पार पाडण्यात आली़ ही पद्धत नियमबाह्य असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ विशिष्ट खाजगी दुकानदारांनाच सदरील रक्कम का दिली गेली? संबंधित दुकानांची निवड कोणी केली? लाभार्थ्यांना थेट अनुदान देण्याबाबत शासनाचा एक निर्णय असताना पंचायत समितीस्तरावर हा निर्णय डावलून दुकानदारांना सदरील निधीचा धनादेश कसा काय दिला गेला? अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत़ या अनुषंगाने माहिती घेतली असता जिल्हा परिषदेने वैयक्तीक शौचालयाचे साहित्य लाभार्थ्यांना दिल्या प्रकरणी ४ कोटी २१ लाख ७५ हजार रुपये आतापर्यंत ७ पंचायत समित्यांच्या माध्यमातून दिले असल्याचे समोर आले आहे़ त्यामध्ये गंगाखेड पंचायत समितीने ५ हजार शौचालय साहित्यांची मागणी असताना १७२० लाभार्थ्यांचे साहित्य दिले असून, त्यापोटी ८५ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ जिंतूर पंचायत समितीने ६ हजार लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली होती़ त्यापैकी ८२२ लाभार्थ्यांना ४१ लाख १० हजार रुपये वितरित करण्यात आले़ मानवत पंचायत समितीने १३२५ लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ प्रत्यक्षात १७६० लाभार्र्थ्यांना ४४ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ४३ लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़ पालम पंचायत समितीने ३ हजार ५०० लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ त्यापैकी २ हजार ९०० लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़ त्या बदल्यात १ कोटी ८ लाख ७० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ३६ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़
परभणी पंचायत समितीने २ हजार लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली़ त्यापैकी ५६२ लाभार्थ्यांना १४ लाख ४५ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे़ आणखी १३ लाख ६५ हजार रुपयांचा निधी देणे बाकी आहे़ पाथरी पंचायत समितीने १२०० लाभार्थ्यांच्या साहित्याची मागणी केली होती़ त्यापैकी १४२५ लाभार्थ्यांपोटी ३९ लाख ७५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ आणखी ३१ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करणे बाकी आहे़ सोनपेठ पंचायत समितीने २१०० लाभार्थ्यांच्या निधीची मागणी केली़ त्यापैकी १६८१ लाभार्थ्यांना ८४ लाख ५ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.