विदेशी मद्यसाठ्यासह ४ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By मारोती जुंबडे | Published: December 10, 2023 02:30 PM2023-12-10T14:30:13+5:302023-12-10T14:30:29+5:30
गोवा राज्याचा विदेशी मद्य ५९.३३ बल्क लिटर, देशी मद्य ७९.२७, विदेशी मद्य ८७.१२ बि. लिटर अशा प्रकारचा विदेशी मद्यसाठा आढळला.
परभणी : राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून भरारी पथकाने पोखर्णी-पाथरी रस्त्यावर श्रीकांत हॉटेल समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची झडती घेतली. यामध्ये एक लाख ५१ हजारांचा विदेशी मद्यसाठा आणि तीन लाखांचे वाहन असा चार लाख ५१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण यांच्या निर्देशाप्रमाणे उपायुक्त उषा वर्मा, परभणीचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून पोखर्णी ते पाथरी रस्त्यावर श्रीकांत हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहन क्रमांक (एमएच २२ क्यू ०९२४) मधून अवैधरीत्या विनापरवाना गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. तसेच बाबासाहेब वाघ याच्या घराची झडती घेतली असता बनावट लेबल असलेल्या परराज्यातील विदेशी मद्यसाठा, बनावट झाकणे, तसेच त्याच्या हॉटेलवरही छापा टाकला असता वेगवेगळ्या प्रकारचा मद्यसाठा आढळला.
गोवा राज्याचा विदेशी मद्य ५९.३३ बल्क लिटर, देशी मद्य ७९.२७, विदेशी मद्य ८७.१२ बि. लिटर अशा प्रकारचा विदेशी मद्यसाठा आढळला. एक लाख ७६ हजार ९२५ रुपयांचा विदेशी मद्यसाठा, तीन लाखांची कार असा एकूण चार लाख ७६ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये बाबासाहेब ज्ञानोबा वाघ (३३, रा. पोखर्णी, ता. जि. परभणी) यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सु. अ. चव्हाण, सर्व दुय्यम निरीक्षक अ. बा. केंद्रे, ए. जे. सय्यद, राहुल चौहान, राहुल बोईनवाड, सागर मोगले, बालाजी कच्छवे यांनी केली.