मासोळी प्रकल्पात ४० टक्के गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:09+5:302021-04-29T04:13:09+5:30
गंगाखेड : तालुक्यातील डोंगर भागात सिंचन व पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारा मोठा प्रकल्प म्हणून मासोळी प्रकल्पाकडे पाहिले जाते. १९७२च्या दुष्काळी ...
गंगाखेड : तालुक्यातील डोंगर भागात सिंचन व पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारा मोठा प्रकल्प म्हणून मासोळी प्रकल्पाकडे पाहिले जाते. १९७२च्या दुष्काळी भीषण परिस्थितीनंतर हा प्रकल्प डोंगर भागात उभारण्यात आला. या प्रकल्पात सद्यस्थितीत ४० टक्क्यांहून अधिक गाळ असल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
लातूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथून उगम झालेल्या मासोळी नदीवर गंगाखेड तालुक्यातील माखणी गाव परिसरात मासोळी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. चौथ्या पंचवार्षिक योजनेत दुष्काळी भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबर भविष्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मासोळी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. हे धरण माती व दगडाने बांधले आहे. जून १९८२पासून या धरणात पाणी साठवण करण्यास सुरुवात झाली. धरणाचा जलसंचय १ हजार २०५.७४ दशलक्ष घनफूट एवढा आहे. मात्र, सद्यस्थितीत या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून अपेक्षित जलसाठा या धरणात होत नाही. त्यामुळे डोंगर भागातील गावांसह शेती सिंचन करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन मासोळी प्रकल्पातील अतिरिक्त गाळ तत्काळ उपसावा, अशी मागणी शहर व तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.