परभणीत कच्च्या रस्त्यात फसलेल्या टँकरमधील ४० टन गॅस केला नष्ट; मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:22 PM2018-07-06T13:22:07+5:302018-07-06T13:28:50+5:30
: परभणी- वसमत रस्त्यावर त्रिधारा पाटी परिसरात ४० टन गॅसचा टँकर कच्च्या रस्त्यात फसल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीने परभणी, पाथरी, जिंतूर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून हा ४० टन गॅस नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली.
परभणी : परभणी- वसमत रस्त्यावर त्रिधारा पाटी परिसरात ४० टन गॅसचा टँकर कच्च्या रस्त्यात फसल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीने परभणी, पाथरी, जिंतूर पालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून हा ४० टन गॅस नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरूवारी रात्री १० च्या सुमारास घडली़ या अपघातामुळे परभणी- वसमत रस्त्यावरील वाहतूक जवळपास ११ तास ठप्प झाली होती़
नागपूर येथून एम़एच़ ०४ पी़ १११९ क्रमाकांचा एच़ पी़ गॅस कंपनीचा टँकर ४० टन गॅस भरून परभणी येथे डिलीव्हरी देण्यासाठी येत होता़ गुरूवारी रात्री १० च्या सुमारास त्रिधारा पाटी परिसरातील परभणी- वसमत रस्त्यालगत असलेल्या वजनकाट्यावर वजन करण्यासाठी चालकाने हे टँकर वळविले असता वजनकाट्याकडे जाणारा रस्ता अत्यंत कच्चा असल्याने व सध्या पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर टँकरचे चाक फसले. त्यानंतर टँकरमधील गॅसची गळती सुरू झाली. याबाबतची माहिती ताडकळस पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस जमादार किशोर कुलकर्णी हे अन्य सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वाहतूक ११ तास ठप्प
याबाबतची माहिती परभणी महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी तातडीने अग्नीशमन दलाचा बंब दाखल झाला. त्यानंतर गॅस गळती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला; परंतु, टँकरमध्ये अधिक गॅस असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून पाथरी व जिंतूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे बंबही मागविण्यात आले. तिन्ही पालिकांच्या बंबाकडून शर्थीचे प्रयत्न करून ४० टन गॅस नष्ट करण्यात आला.
या सर्व कालावधीत परभणी-वसमत रस्त्यावरील जवळपास ११ तास ठप्प झाली होती. सकाळी ९ च्या सुमारास गळती होणारा संपूर्ण गॅस नष्ट केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर, जमादार किशोर कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
गॅसचा टँकर काढताना क्रेन फसले
४० टन वजनाचा गॅसचा टँकर फसून त्यामधून गॅस गळती होत असल्याने ही गॅस गळती रोखण्याचे व फसलेला टँकर काढण्याचे मोठे आव्हान पोलीस कर्मचारी व अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांवर होते. यासाठी परभणी शहरातून एक क्रेन मागून घेण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने टँकर काढत असताना पावसामुळे या भागातील भुसभूसीत झाल्याने क्रेनही फसले. अशाच स्थितीत टँकर काढण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास फसलेले क्रेन काढण्यात आले.