बेस्टसाठी परभणीतून ४०० वाहक- चालक मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:23 PM2020-11-25T17:23:02+5:302020-11-25T17:25:33+5:30
परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे.
परभणी : मुंबई येथे बेस्टच्या बस वाहतूक सेवेसाठी जिल्ह्यातील ४०० वाहक आणि चालकांना मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, हे कर्मचारी पंधरा दिवस तेथे सेवा बजावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कमी भारमान असणाऱ्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.
मुंबई येथे लोकल बससेवा चालविणाऱ्या ‘बेस्ट’साठी महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाने बस गाड्यांबरोबरच कर्मचारीही पुरविले आहेत. कोरोनाच्या संकट काळात मुंबईतील बससेवा सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राज्यभरातून टप्प्या-टप्प्याने कर्मचाऱ्यांना मुंबई येथे सेवेसाठी पाठविले जात आहे. कोरोनाची परिस्थिती आणि वाहक- चालकांची कमतरता लक्षात घेता, महामंडळाच्या परभणी विभागातून २०० वाहक आणि २०० चालक असे ४०० कर्मचारी २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, २३ नोव्हेंबरपासून सेवेत रुजू झाले आहेत.
परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी विभागातील काही बससेवांवर परिणाम झाला आहे. परभणी विभागात २ हजार ४२७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार ७६० वाहक आणि चालक आहेत. चारशे कर्मचारी मुंबईला रवाना केल्याने ५ टक्के बससेवा बंद कराव्या लागल्या आहेत. ज्या मार्गावर कमी भारमान होते, अशा मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक असलेल्या सेवांवर कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेऊन त्या मार्गावर बससेवा सुरू ठेवली जात असल्याने एस.टी. महामंडळातून सांगण्यात आले.