ग्रामीण भागात ४२, तर शहरी भागात ४८ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:20+5:302021-09-03T04:19:20+5:30
परभणी : जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध झाला असून, ग्रामीण भागात ४२, तर शहरी भागात ४८ टक्के नागरिकांचे लसीकरण ...
परभणी : जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध झाला असून, ग्रामीण भागात ४२, तर शहरी भागात ४८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला ९० हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून, दररोज सुमारे दहा हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला लसीकरण करणे आवश्यक आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले; परंतु कधी लसीचा तुटवडा, तर कधी नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
ग्रामीण भागातील ११ लाख ३ हजार १९१ नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. त्यापैकी ४ लाख ६९ हजार ४२९ नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. लसीकरणाची टक्केवारी ४२.५५ टक्के एवढी आहे. शहरी भागात देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सर्व शहरी भागात ५ लाख ५ हजार ६५९ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. त्यापैकी २ लाख ४७ हजार १७८ नागरिकांनी लस घेतली आहे. हे प्रमाण ४८.८८ टक्के एवढे आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमधील लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यातच जिल्ह्याला मुबलक लस उपलब्ध झाल्याने मागील दोन दिवसांपासून दररोज १० हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. याच पद्धतीने लसीकरण झाले तर आगामी दोन ते तीन महिन्यांत उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते.
मनपा अंतर्गत एक लाख नागरिकांचे लसीकरण
परभणी शहरातही आता लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसत आहे. शहरातील तीन लाख ५५ हजार १६९ नागरिकांपैकी दोन लाख २६ हजार ८२६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. आतापर्यंत १ लाख १७ हजार १४८ नागरिकांनी लस घेतली आहे. विशेष म्हणजे ७६ हजार ५८५ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, ४० हजार ५६३ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
शहरी भागातील लसीकरण
गंगाखेड ५२ टक्के
जिंतूर ६७
मानवत ६१
पालम ४३
पाथरी ४३
पूर्णा ५२
सेलू ६५
सोनपेठ ११