रस्त्यांच्या कामांसाठी ४४ कोटींचा निधी प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:33+5:302021-06-30T04:12:33+5:30
परभणी : जिल्ह्यातील रस्त्यांच्या जुन्या कामांसाठी २९ कोटी ४५ लाख आणि नवीन कामांसाठी १४ कोटी ५२ लाख असा ४३ ...
परभणी : जिल्ह्यातील रस्त्यांच्या जुन्या कामांसाठी २९ कोटी ४५ लाख आणि नवीन कामांसाठी १४ कोटी ५२ लाख असा ४३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित आहे. कोरोनाचा संसर्ग असला तरी अधिकाधिक निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करून रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी येथे दिली.
जिल्ह्यातील रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आणि काही लोकप्रतिनिधींच्या मागण्या जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आले होते. माजी खा. तुकाराम रेंगे यांच्या निवासस्थानी त्यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील रस्ते विकासाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, आ. अमर राजूरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश वरपूडकर, माजी खा. तुकाराम रेंगे, सुरेश नागरे आदींची उपस्थिती होती.
अशोक चव्हाण म्हणाले, रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी मागील वर्षी २२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी दिला. यावर्षीही निधी प्रस्तावित आहे. कोरोनाचा संसर्गामुळे राज्यासमोर निधीची अडचण आहे. मात्र, तरीही अधिकाधिक निधी दिला जाईल. नाबार्ड, हॅम आणि एडीबी या योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जात आहेत. हौम योजनेअंतर्गत ८६१ कोटी रुपयांची चार कामे प्रस्तावित आहेत. परभणी जिल्ह्यात २५७ कि.मी.चे काम प्रस्तावित असून, त्यापैकी १६३ कि.मी.च्या कामाला गती देण्याची गरज आहे. हे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते झाले नाही. या कामास डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे तसेच एडीबी योजनेअंतर्गत ५८९ कोटींची कामे प्रस्तावित असून, परभणी जिल्ह्यात या अंतर्गत ८२ कि.मी.चा सिमेंट काँक्रिट रस्ता होणार आहे. या कामाच्या निविदा लवकरच काढल्या जातील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत केंद्र सरकारने चुकीचे कंत्राटदार निवडले. त्यामुळे कामे संथगतीने होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.