वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या ४५० संचिका सात महिन्यांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:35+5:302021-09-21T04:20:35+5:30
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या जवळपास ४५० संचिका शिक्षण विभागात एकाच टेबलवर गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात ...
परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या जवळपास ४५० संचिका शिक्षण विभागात एकाच टेबलवर गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्या असून, या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या संचिकांच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वी या विभागातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही हा प्रश्न सुटलेला दिसत नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवारी जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, त्यात जि. प. शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या ४५० संचिका शिक्षण विभागात एकाच टेबलवर मागील सात महिन्यांपासून प्रलंबित आहेत. या संचिकांना आरोग्य व अर्थ विभागाकडून मान्यता मिळालेली आहे. अंतिम मान्यता शिक्षण विभागाकडून मिळणे आवश्यक असताना शिक्षकांना अंतिम मान्यतेसंदर्भात लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासन दिले जात आहे. वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले प्रलंबित असल्याने ही बिले दाखल केलेले शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या संचिका लवकरात लवकर निकाली काढाव्यात, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे व इतरांनी केली आहे.