गंगाखेड तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठा झाला बंद; थकबाकीमुळे महावितरणने वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:48 PM2018-02-16T18:48:36+5:302018-02-16T18:49:50+5:30
गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
परभणी : गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
महावितरणचे तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. अनेक महिन्यांपासून वीज बिलाचा भरणा केला नसल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. त्यामुळे महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील उंडेगाव, धारासूर, महातपुरी, पिंपळदरी, खळी, सुप्पा, कुंडगीरवाडी, चिंचटाकळी, मरडसगाव, राणीसावरगाव, लिंबेवाडी, रुमणा जवळा, डोंगरगाव, डोंगरजवळा, डोंगर पिंपळा, गौळवाडी, दामपुरी आदी ४७ गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या गावातील पाणी पुरवठा योजना बंद झाल्या आहेत़ त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़
इतर ग्राहकांकडेही थकले वीज बिल
तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीकडे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच नगर परिषदेकडे पथदिव्याची तसेच, कृषी ग्राहक, औद्योगिक व घरगुती विजेचा वापर करणार्या ग्राहकांकडेही थकबाकी आहे. महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई उपविभागीय अभियंता साहेबराव सोनवणे, सहाय्यक अभियंता एन.सी. भसारकर, एस.यु.गिरी, पी.जी.ढोणे, कनिष्ठ अभियंता धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गाव पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांची वसुली वेळेवर होत नसल्याने वीज बिल भरणा करण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती राणीसावरगावचे सरपंच सोमनाथ कुदमुळे यांनी दिली.
ग्रा.पं.च्या स्वखर्चातून वीज बिल भरणा करावा
ग्रामपंचायतस्तरावर पथदिवे, पाणीपुरवठा विभागाच्या वीज बिलाचा भरणा यापूर्वी वित्त आयोगाच्या निधीतून केला जात होता. मात्र यावर शासनाने निर्बंध लावून कृती आराड्यानुसार वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच ग्रा.पं.कडे वीज बिलाची रक्कम थकली आहे. ही रक्कम ग्रा.पं.च्या स्व उत्पन्नातून भरणा करावी, अशा सूचना ग्रामसेवकामार्फत दिल्या आहेत.
- टी.बी. शिंदे, गटविकास अधिकारी