सव्वाशे वर्षांचा रेल्वेपूल ब्रॉडगेजच्या ओझ्याने वाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:56+5:302020-12-11T04:43:56+5:30
परभणी- परळी या लोहमार्गावर गंगाखेड शहराजवळ गोदावरीवर मोठा रेल्वे पूल आहे. या रेल्वे पुलाच्या संरक्षण आणि मजबुतीसाठी बांधलेल्या दगडी ...
परभणी- परळी या लोहमार्गावर गंगाखेड शहराजवळ गोदावरीवर मोठा रेल्वे पूल आहे. या रेल्वे पुलाच्या संरक्षण आणि मजबुतीसाठी बांधलेल्या दगडी पिचिंगला तडे गेले असून, पिचिंगचा खालचा भाग ढासळला आहे. पुलाच्या पिलरचा एक एक चिरा निखळत आहे. पिचिंगवर गवत आणि छोटी झाडे वाढल्याने पुलाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
निजामकालीन काळात १८८८ मध्ये हा पूल बांधलेला आहे. त्याकाळी टाॅय ट्रेन वाहतूक चार- सहा वेळा होत होती. १९८० पर्यंत वाहन क्षमता कमी होती. नंतरच्या काळात १९९३ मध्ये मीटर गेजच्या लोहमार्गावर ब्राॅडगेज ओझे पडले. पूर्वी या रेल्वे पुलावर लोहमार्गाच्या खाली लाकडी ओंडके होते. ब्राॅडगेज करताना सिमेंट क्राॅंक्रेट ओंडके टाकून पुलावरचे ओझे वाढविले. पुलावरून पायी जाण्यासाठी सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करण्यात आला. यामुळे या पुलावरचे ओझे आणखी आणखीच वाढवले. ब्राॅडगेजसाठी लोहमार्गावरील मधले अंतर वाढले आहे. मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या या पुलावरून ३० ते ३५ फेऱ्या होतात. मीटरगेजच्या पुलाचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर होऊन १७ वर्षे झाली आहेत. पुलावरच्या वाहन क्षमतेत ६० टक्के वाढ झाल्याने पुलाच्या सुरक्षिततेसाठी पुनर्दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.
सुरक्षेचा निर्माण झाला प्रश्न
१७ वर्षांपासून हा पूल ब्राॅडगेजचे ओझे वाहत असल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. या पुलावरुन आता वाहतूक वाढली आहे.
पुलाच्या खांबाजवळ अनेक वर्षांपासून वाळू उपसा होतो. त्यामुळे पाया खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या पाचशे मीटर अंतरापर्यंत वाळू उपशास बंधन असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
पूल दुरुस्ती प्रस्ताव लांबणीवर
रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित एखाद्या पुलाचे आर्युमान १०० वर्षे पूर्ण झाल्यास त्या पुलाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करुन दुरुस्ती केली जाते. गंगाखेड येथील रेल्वे पुलाला १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असून, या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लांबणीवर टाकला आहे. सध्याची स्थिती पाहता, दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे.
पुलाची लांबी
३०० मीटर
एकूण खांब व उंची
२५ मीटरचे १८ खांब