बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ५ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:59 PM2020-01-31T16:59:01+5:302020-01-31T17:11:07+5:30
संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले.
परभणी : पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी शुक्रवारी संपावर गेल्याने जिल्ह्यात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प पडला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला असून, या संपात परभणी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. दररोज बँकांमधून होणारे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. त्यात आरटीजीएस, एनईएफटी, चेक क्लिअरन्स, खात्यामधून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे ही सर्व कामे दिवसभर ठप्प पडली. त्यामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी इंडिया बँकेच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महात्मा फुले यांचा पुतळा, जिल्हा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकंदर बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प पडल्याचे दिसून आले.
वीस बॅंकांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
परभणी जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँका असून या बँकांच्या १६४ शाखा जिल्हाभरात विखुरलेल्या आहेत. या सर्व शाखांमधील सुमारे ३ हजार कर्मचारी आजच्या संपामध्ये सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
काय आहेत मागण्या
पगार पत्रकाच्या घटकांवर २० टक्के वेतनवाढ द्यावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, स्पेशल अलाऊन्स हा बेसिकमध्ये समाविष्ट करावा, एनपीएस योजना निकाली काढावी, पेन्शनमध्ये सुधारणा करा, अधिकार्यांसाठी कामाचे तास निश्चित करावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.