पाच हजार शेतकऱ्यांना नाकारली गारपिटीची नुकसान भरपाई; अडीच कोटीचा बसला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:51 PM2018-03-29T18:51:35+5:302018-03-29T18:51:35+5:30

जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता.

5000 farmers reject compensation for hail; Twenty-two crores hit the bus | पाच हजार शेतकऱ्यांना नाकारली गारपिटीची नुकसान भरपाई; अडीच कोटीचा बसला फटका 

पाच हजार शेतकऱ्यांना नाकारली गारपिटीची नुकसान भरपाई; अडीच कोटीचा बसला फटका 

Next

- विजय चोरडिया

जिंतूर (परभणी ) : तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता. प्रशासनाने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता; परंतु, शासनाने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान मिळण्याच्या आशा आता मावळल्या आहेत.

जिंतूर तालुक्यात फेब्रुवारी, मार्च २०१६ मध्ये १८ गावांत मोठी गारपीट झाली होती. यामध्ये हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने त्यावेळी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले होते. मदतीसाठी जिरायत क्षेत्र ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर व फळ पिके १८ हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळावी, म्हणून शासनाकडे प्रस्तावही पाठविला होता. 

या गारपिटीमध्ये सावंगी म्हाळसा या गावातील ५७३ शेतकऱ्यांचे १९ लाख ७१ हजार ७२०, मुरूमखेडा २३ शेतकऱ्यांचे १ लाख ७९ हजार, किन्ही येथील १४९ शेतकऱ्यांचे ४ लाख ५२ हजार, हिवरखेडा येथील २५८ शेतकऱ्यांचे ९ लाख ३ हजार, दाभा येथील ३५१ शेतकऱ्यांचे २७ लाख १६ हजार, डिग्रस येथील ५१० शेतकऱ्यांचे ४० लाख ७९ हजार, सायखेडा येथील १८२ शेतकऱ्यांचे ४ लाख ८२ हजार, केहाळ येथील १ हजार ६२ शेतकऱ्यांचे ६१ लाख ९९ हजार, सावळी येथील ६८१ शेतकऱ्यांचे ३२ लाख ५२ हजार, घडोळी येथील २८६ शेतकऱ्यांचे १३ लाख ४ हजार, बामणी येथील ३८६ शेतकऱ्यांचे ६ लाख ३७ हजार, चौधरणी येथील ४० शेतकऱ्यांचे २ लाख ६१ हजार, कवठा बदनापूर येथील ५८ शेतकऱ्यांचे ९७ हजार, कोलपा येथील १३ शेतकऱ्यांचे १३ हजार, उमरद येथील २०३ शेतकऱ्यांचे ११ लाख ९५ हजार, बेलखेडा येथील ८९ शेतकऱ्यांचे ६ लाख ७२ हजार असे एकूण ४ हजार ६७४ शेतकऱ्यांचे २ कोटी ६७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. 

या गारपिटीमध्ये २ हजार ९०१ हेक्टर जिरायत, ४१४ हेक्टर बागायत व ७७ हेक्टर फळ पिके असे एकूण ३ हजार ३९३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होेते. यामध्ये जिरायत शेतकऱ्यांना १ कोटी ९७ लाख ३२ हजार, बागायतदारांना ५५ लाख ९६ हजार व फळ पिकांना १२ लाख ८३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार होती; परंतु, राज्य शासनाने या लाभार्थ्यांना २०१५ ला खरिपाचे अनुदान मिळाले. ही सबब पुढे करून मार्च २०१६ च्या गारपिटीचे अनुदान देण्यास नकार दिला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.

केहाळ, डिग्रसचे सर्वाधिक नुकसान
४२०१६ मध्ये झालेल्या गारपिटीमध्ये तालुक्यातील केहाळ, डिग्रस या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. केहाळ येथील १ हजार ६२ शेतकऱ्यांचे ६२ लाखांचे तर डिग्रस येथील ५१० शेतकऱ्यांचे ४० लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ही दोन्ही गावे गारपिटीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे या शेतकऱ्यांना आपल्या मदतीवर पाणी फेरावे लागल्याचे दिसून येत आहे. 

पाठपुरावा करणार 
जिंतूर विधानसभा मतदार संघातील १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना गारपिटीची मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासन दरबारी या प्रकरणाचा पाठपुरावा करून आपद्ग्रस्तांना मदत मिळवून देऊ.
-विजय भांबळे, आमदार जिंतूर-सेलू मतदार संघ

गावांना मदत देता आली नाही
राज्य शासनाने १० मार्च २०१६ ला परिपत्रक पाठवून जी गावे दुष्काळमुक्त यादीत आहेत व ज्या गावांना अनुदान मिळालेले आहे, अशा गावांना परत मदतीसाठी ग्राह्यधरू नये, असे आदेश असल्याने या गावांना मदत देता आली नाही. 
- सुरेश शेजूळ, तहसीलदार 

टोलवाटोलवीची उत्तरे दिली
या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला; परंतु, सतत प्रशासनाने आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. या गारपिटीमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, आम्हाला मदत मिळाली नाही तर मोठे आर्थिक संकट गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभे राहणार आहे.
- प्रभाकर चव्हाण, शेतकरी

Web Title: 5000 farmers reject compensation for hail; Twenty-two crores hit the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.