लसीकरणासाठी ५ हजार मनुष्यबळाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:48 AM2020-12-04T04:48:05+5:302020-12-04T04:48:05+5:30
परभणी: कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरी भाग ...
परभणी: कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागात शासकीय आणि खासगी असे मिळून ५ हजार ५७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असून त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली आहे.
एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाने जिल्ह्यासह राज्यभरात धुमाकूळ घातला. आता जिल्ह्यातील संसर्ग कमी झाला असून कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, एएनएम, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे कर्मचारी अशा शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदवावा लागणार आहे. जिल्ह्यात ५ हजार ५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागेल, असा अंदाज असून त्याचा अहवालही वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परभणीचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागात १ हजार ५७, पाथरी ४१३, पूर्णा ६४८, सेलू ५१९, सोनपेठ ३०९, गंगाखेड ६६०, जिंतूर ६६२, मानवत ३५८ आणि पालम तालुक्यामध्ये ४७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. तशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.
साडेसातशे कर्मचारी प्रशिक्षित
लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्यासाठी ५ हजार ५७ कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असली तरी प्रत्यक्षात त्यातील ७७८ कर्मचारीच लसीकरणासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. उर्वरित ४ हजार ३०९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगानेही जिल्हा परिषद प्रशासन तयारी करीत आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये गंगाखेड तालुक्यात ७५, जिंतूर १०१, मानवत १०३, पालम ३३, परभणी २८०, पाथरी २७, पूर्णा ५९, सेलू ४७ आणि सोनपेठ तालुक्यात ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लसीचे पहिले हक्कदार
लसीकरण मोहिमेसाठी ५ हजार ५७ कर्मचाऱ्यांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत करण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रथम लसीकरण केले जाणार असून हे कर्मचारी लसीचे हक्कदार ठरणार आहेत.
असे लागणार कर्मचारी
वैद्यकीय अधिकारी ३२६, क्षेत्रीय कर्मचारी ४ हजार २३३, परिचारिका, पर्यवेक्षक १७३, वैद्यकीय कर्मचारी ६८, सहकारी कर्मचारी १०१, प्रशासकीय कर्मचारी १५६