महिनाभरात ५५ अपघातांची आयआरएडी ॲपवर नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:10+5:302021-07-07T04:22:10+5:30
परभणी : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेल्या इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेसाबेस (आयआरएडी) या प्रकल्पाला जिल्ह्यात ...
परभणी : केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेल्या इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेसाबेस (आयआरएडी) या प्रकल्पाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, महिनाभरात अपघाताच्या ५५ नोंदी करण्यात आल्या आहेत.
रस्त्यांवरील अपघातांची माहिती एकत्रितरीत्या संकलित व्हावी आणि या माहितीच्या आधारे रस्ते अपघाताचे विश्लेषण करून अपघात कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आयआरएडी हा प्रकल्प सुरू केला आहे. जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली असून, आतापर्यंत ५५ अपघातांच्या नोंदी ॲपवर करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ठिकठिकाणी झालेले अपघात एकत्रितरीत्या संकलित होत असल्याने कोणत्या रस्त्यावर अधिक अपघात होतात, या अपघातांची कारणे काय? जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळे कोणती? यासह जिल्ह्यात अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण किती आहे? याचा निष्कर्ष या ॲपच्या माध्यमातून काढला जाणार आहे. महिनाभरात या ॲपमध्ये ५५ नोंदी झाल्या आहेत.
दैठणा ठाण्यांतर्गत सर्वाधिक अपघात
मागील एक महिन्याच्या काळात जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांनी ठाण्यांतर्गत झालेल्या अपघातांच्या नोंदी या ॲपवर केल्या आहेत. त्यात दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ८ अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याचप्रमाणे जिंतूर आणि गंगाखेड ठाण्यांतर्गत ७, चुडावा, सेलू व नवा मोंढा ठाण्यांतर्गत प्रत्येकी ६, परभणी ग्रामीण, कोतवाली ठाण्यांतर्गत ४, पालम, नानलपेठ ठाण्यांतर्गत प्रत्येकी ३, मानवत ठाण्यांतर्गत २, तर बोरी, पिंपळदरी, पूर्णा, पाथरी आणि सोनपेठ पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एका अपघाताची नोंद झाली आहे.
असे चालणार काम
प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या ॲपचे लॉगिन दिले आहे. हे कर्मचारी अपघात झाल्यानंतर ॲपवर नोंद घेणार आहेत.
त्यामध्ये वाहनधारकांच्या परवान्यांचीही नोंदणी केली जाणार आहे.
५ विभागांचा समावेश
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेल्या या प्रकल्पात पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम आणि प्रादेशिक परिवहन या ५ विभागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ॲपवर नोंद झालेल्या माहितीच्या आधारे पाचही विभागांना निष्कर्ष काढून उपाययोजना करता येणार आहेत.
जीपीएसच्या साहाय्याने स्थळ निश्चित होणार
या ॲपमध्ये जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने अपघाताचे स्थळ निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या स्थळावर किती अपघात होतात, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे अपघाताची इतर कारणेही नोंद केली जाणार असून, त्यात वाहनधारकांकडे वाहन चालविण्याचा परवाना होता का? अपघाताचे नेमके कारण काय? या बाबींचा समावेश असल्याने अपघातांची कारणमीमांसाही होणार आहे.