जिल्ह्यात ५५ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली; टीव्ही, फ्रीज, बाइक तरी मोफत रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:18 AM2021-07-31T04:18:59+5:302021-07-31T04:18:59+5:30
दारिद्र्यरेषेखाली नोंद असलेल्या अनेक लाभार्थ्यांच्या घरी टीव्ही, फ्रीज, मोबाइल, मोटारसायकल यासारख्या चैनीच्या वस्तू आहेत. असे असतानाही मोफत रेशनचा लाभ ...
दारिद्र्यरेषेखाली नोंद असलेल्या अनेक लाभार्थ्यांच्या घरी टीव्ही, फ्रीज, मोबाइल, मोटारसायकल यासारख्या चैनीच्या वस्तू आहेत. असे असतानाही मोफत रेशनचा लाभ मात्र दिला जात आहे.
अडीच लाख कार्डधारक
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मोफत धान्य दिले जात आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील ४२ हजार ८१९ कार्डधारक असून, या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ९७ हजार ६१५ एवढी आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ७ हजार २६५ कार्डधारक असून, या कार्डांवरील ९ लाख ९० हजार ६४५ लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. मागील तीन महिन्यांपासून ही योजना सुरू आहे.
दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही
जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून दारिद्र्यरेषेखालील नागरिकांचा आढावाच घेतलेला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून दारिद्र्यरेषेखालीच्या नावाने लाभ दिले जातात.
प्रत्येक दहा वर्षांनी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचा सर्व्हे करणे अपेक्षित आहे. शासनाने त्याकडे कानाडोळा केल्यामुळे ही संख्या वाढत आहे.
कोण गरीब, कोण श्रीमंत, ११ लाख लोकांना मोफत रेशन !
कोरोनाच्या संकटकाळात गरीब नागरिकांसाठी शासनाने मोफत धान्यपुरवठा सुरू केला. हे धान्य गोरगरिबांसाठीच उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांच्या नावाखाली ज्यांच्या घरी टीव्ही, फ्रीज, मोबाइल यासारख्या चैनीच्या वस्तू आहेत, अशा नागरिकांनीही मोफत धान्याचा लाभ घेतला आहे.
२१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न
ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये एवढे आहे. अशा नागरिकांना दारिद्र्यरेषेखालील योजनांचे निकष लागू होतात.
सध्याची वाढलेली महागाई लक्षात घेता २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यात किती नागरिक आहेत, हा संशोधनाचाच विषय आहे.