परभणीत ५९ टक्के खरीपक्षेत्र पडीक राहण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:08 PM2019-07-09T16:08:38+5:302019-07-09T16:10:59+5:30
पाऊस लांबल्याने अडचणीत वाढ
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़
मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. तर रबी हंगामात पावसाअभावी पेरणीच झाली नव्हती़ परभणी जिल्ह्यात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी सामना करीत आहेत. यावर्षीच्या हंगामातून मोठ्या अपेक्षा होत्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शेतकरी खरीप पेरण्यांच्या तयारीला लागले़ मात्र पावसाने खोडा घातल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण आहे़ जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला असला तरी जमिनीत ओल निर्माण झाली नाही़ शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मात्र अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़
४१ टक्केच पेरण्या
जिल्ह्यात सद्य:स्थितीला झालेल्या ४१ टक्के पेरण्या वगळता उर्वरित ५९ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातही नुकसानीची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.