सोनपेठ तालुक्यात बोंडअळीचे ६ कोटींचे अनुदान बँकेत जमा; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 07:13 PM2018-08-11T19:13:58+5:302018-08-11T19:15:37+5:30
तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़
सोनपेठ(परभणी) : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़ यातील ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटपासाठी बँकाकडे पाठविण्यात आली आहे़
सोनपेठ तालुक्यात गतवर्षी शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टवर कापूस पिकाची लागवड केली होती. पीक बहरात असताना बोंडअळीने हल्ला सुरू केला. महागडी औषधी फवारूनही पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. शासनाने बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे करण्यात आले.
तालुक्यातील ६२ गावांतील कापसाचे पीक बोंडअळीच्या हल्ल्याने फस्त झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १९ गावातील ८ हजार ८४३ शेतकऱ्यांना ४ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यानंतर काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यामध्ये ३० गावांतील १५ हजार ८९५ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे .
यातील कोठाळा, उखळी, उक्कडगाव, खपाट पिंपरी, डिघोळ, तीवठाणा, थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, निमगाव, निळा, नरवाडी, पोंहडूळ, पोंहडूळ तांडा, मरगळवाडी, मोहळा, लासीना, लोहीग्राम, वंदन, वाडी, नैकोटा, वाडी पिंपळगाव, शिर्शी, शिरोरी, शेळगाव हटकर, सोनपेठ, सायखेड या २५ गावांतील १२ हजार ५३० शेतकऱ्यांचे ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रुपयांच्या अनुदान वाटपाची यादी बँकेकडे पाठविली आहे. वडगाव, नैकोटा, शेळगाव म., सोनखेड, पारधवाडी या पाच गावांतील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांची यादी लवकरच बँकेकडे पाठविण्यात येणार आहे़
६० लाख २९ हजारांच्या निधीची प्रतीक्षा
तालुक्यातील ६२ गावांपैकी १९ गावांतील शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर २५ गावांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तर पाच गावांतील बँकेमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी विटा, वाणीसंगम, वैतागवाडी या गावातील अनुदान वाटपाच्या प्रक्रियेला गती आलेली नाही. या गावातील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते उपलब्ध झाले नाही. तसेच निधीची चणचणही भासत असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. या गावांतील १ हजार ४७ शेतकऱ्यांना ६० लाख २९ हजार १६० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हे अनुदान लवकर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार जीवराज डापकर म्हणाले की, उर्वरित अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल.