शहरात ६ चाचणी केंद्र तरीही प्रतिसाद थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:37+5:302021-09-04T04:22:37+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून केवळ ३ कोरोना चाचणी केंद्र कार्यरत होते. यात ३ केंद्रांची वाढ झाली आहे. शहरातील गंगाखेड नाका ...
गेल्या अनेक दिवसांपासून केवळ ३ कोरोना चाचणी केंद्र कार्यरत होते. यात ३ केंद्रांची वाढ झाली आहे. शहरातील गंगाखेड नाका परिसरातील विभागीय कार्यशाळा परिसर, जिंतूर रोड वरील विसावा कॉर्नर पोलीस चौकी तसेच अपना कॉर्नर परिसरात नवीन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासह पूर्वीचे काळीकमान, जाम नाका व गांधी पार्क येथील चाचणी केंद्र सुरू आहेत. असे असतानाही शहरातील चाचण्यांची संख्या मात्र वाढत नसल्याचे दिसून येते. गांधी पार्कात पथक सकाळी ७ ते ११ या वेळेत होणारी दूध व्यावसायिक, फळ, भाजीपाला व अन्य विक्रेत्यांची गर्दी लक्षात घेता थांबत आहे. तसेच सायंकाळीसुध्दा पथक कार्यरत राहत आहे. परंतु, पथकासमवेत पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त नसल्याने अनेक नागरिक चाचणी न करता पळ काढत आहेत.
अँटिजन चाचणीला मिळेना प्रतिसाद
शहरात ६ ठिकाणी सुरू असलेल्या चाचणी केंद्रांवर केवळ आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र, अँटिजन चाचणीसाठी स्वतंत्र सुरू केलेले सिटी क्लब येथील चाचणी केंद्र मागील १ महिन्यापासून कर्मचारी कार्यरत असतानाही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे. तसेच रेल्वेस्थानक येथे परराज्यातून येणाऱ्या काही मोजक्या रेल्वेच्या वेळी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी हजर होते. मात्र, सर्वच केंद्रांवर नागरिकांनी चाचणी करण्याकडे पाठ फिरविल्याचे गेल्या काही दिवसातील आकडेवारीवरून दिसून येते.