जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:43 PM2020-07-16T12:43:39+5:302020-07-16T12:43:57+5:30
जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीवर १४ जुलैपासून उपचार सुरू होते
परभणी: जिंतूर शहरातील नुरानी कॉलनी भागातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री २.४० वाजेच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री २.४० वाजेच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये जिंतूर, सेलू तालुक्यातील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे.
९ जणांना कोरोनाची लागण
जिल्हा प्रशासनास बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आणखी ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सेलू शहरातील सर्वोदय नगर येथील एक, तालुक्यातील हादगाव पावडे येथील १, पाथरी शहरातील एकता नगर भागातील ३, जिंतूर शहरातील नुरानी कॉलनी येथील १, परभणीतील दिलकश चौक, गणेशनगर येथील प्रत्येकी १ व तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३११ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५४ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.