६९ उपद्रवी माकडांना केले पिंजऱ्यात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:23+5:302021-07-08T04:13:23+5:30
कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ...
कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील आंभई येथील समाधान गिरी यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कुपटा परिसरात मागील काही वर्षांपासून २५० ते ३०० माकडांचा मुक्तसंचार आहे. माकडांच्या उपद्व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, माकडांचा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थांनी गावातील झाडे तोडून त्यांचा निवारा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या माकडांनी घरांच्या पत्रावर, छतावर निवारा करण्यास सुरुवात केली आणि माकडांचा धुडगूस अधिकच वाढला. पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने पत्रे खिळखिळे होऊ लागली, तसेच छतावर ठेवलेले सोलारचे साहित्य व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून केली जात होती. अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहेत. या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर महिला-मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
माकडांच्या या उपद्व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर, समीर दुधगावकर यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने वन्यजीव प्राणिमित्रांचे एक पथक ७ जुलै रोजी गावात दाखल झाले. या पथकातील समाधान गिरी यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून ६९ माकडांना कोणतीही इजा न होऊ देता, पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अभयारण्यात नेऊन सोडणार
या सर्व माकडांना बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सातपुडा अभयारण्यात नेऊन सोडले जाणार आहे, असे समाधान गिरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मदतीला संदीप गिरी, कृष्णा गिरी आदी उपस्थित होते. सरपंच अंकुश सोळंके, समीर दुधगावकर, नीलेश सोळंके, प्रताप सोळंके, राहुल सोळंके, गोपीनाथ सोळंके, शिवाजीराव सोळंके, अनिल गडदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माकडांच्या त्रासाला कंटाळून वृक्ष तोडणे हा पर्याय नाही. यासाठी ग्रामपंचायीने ठराव घेऊन वनविभागाला द्यावा, वनविभागातून आम्हाला कळविल्यास आम्ही माकडांना घेऊन जंगलात सोडतो. यामुळे वृक्षतोड थांबेल व पर्यायवरणाचीही हानी होणार नाही. त्याचप्रमाणे, माकडांना त्यांच्या हक्काचे घरही मिळेल.
समाधान गिरी, वन्यजीव प्राणिमित्र.