परभणीतील एका छोट्या गावात सापडला ६९ पोते गुटखा; बाजारभावानुसार १ करोड किंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:13 PM2019-02-20T13:13:24+5:302019-02-20T13:14:02+5:30
ग्रामीण भागात गुटख्याचा मोठा साठा आढळल्याने पोलीस अधिकारीही अचंबित झाले आहेत़
परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला होता़ रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद केली असता, एमआरपीप्रमाणे २५ लाख रुपयांचा हा गुटखा असून, बाजारभावात याच गुटख्याची किंमत १ कोटीच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले़ दरम्यान, या छाप्यामध्ये एकूण ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़
तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुगंधीत तंबाखू आणि गुटखा विक्रीला राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यामध्ये सर्रास गुटख्याची विक्री होते़ या गुटख्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते़ पोलीस प्रशासनाने यापूर्वी गुटखा विक्रीविरूद्ध कारवाया केल्या असल्या तरी या विक्रीला प्रतिबंध लागलेला नाही़
सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बोरी येथील कौसडी रस्त्यावरील संभाजीनगर भागात कारवाई केली होती़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना या गुटख्या संदर्भात माहिती मिळाली़ या माहितीच्या आधारे पथकाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संभाजीनगर भागात छापा टाकला होता़ त्यावेळी २ चारचाकी गाड्यांमधून हा गुटखा उतरविला जात असताना पोलिसांनी जप्त केला़ ३९ मोठे पोते आणि ३० छोटे पोते गुटखा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरापर्यंत या गुटख्याची मोजदाद सुरू होती़ त्यामुळे पकडलेल्या गुटख्याची नेमकी किंमत किती ही माहिती मिळू शकली नाही़ रात्री उशिरानेच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे़
विशेष पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ लाख ६५ हजार ५९० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़ तसेच नगदी १ लाख ३ हजार रुपये, १६ लाख ५० हजार रुपयांच्या दोन चारचाकी गाड्या आणि २७ हजार रुपयांचे मोबाईल असा ४३ लाख १६ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला़ या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़
जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात गुटख्याचा मोठा साठा आढळल्याने पोलीस अधिकारीही अचंबित झाले आहेत़ ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कोठून आला. गुटख्याचा मूळ मालक कोण? व्यवहार कसा केला जातो? या अनुषंगाने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.