जिल्ह्यातील ७२ महाविद्यालये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:04+5:302021-02-16T04:19:04+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेली महाविद्यालये तब्बल दहा महिन्यांनंतर सोमवारी सुरू झाली. आतापर्यंत ओसाड असलेला हा परिसर विद्यार्थ्यांच्या ...
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेली महाविद्यालये तब्बल दहा महिन्यांनंतर सोमवारी सुरू झाली. आतापर्यंत ओसाड असलेला हा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मात्र प्रथमच गजबजून गेला.
कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासून शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू असले, तरी महाविद्यालये मात्र बंद होती. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ फेब्रुवारीपासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयातील अध्यापन सुरू झाले आहे. सोमवारी महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढलेला होता. अनेक महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनीही पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शविली.
जिल्ह्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ७२ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधून ३० हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या नियमानुसार ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थितीतच महाविद्यालये सुरू करण्यात आली. सोमवारी मात्र, अनेक महाविद्यालयांमधून सर्वसाधारणपणे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत उपस्थिती दिसून आली.
महाविद्यालयांनी केले प्रतिबंधात्मक उपाय
सोमवारपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याने महाविद्यालय प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय केल्याचे दिसून आले. शहरी भागातील सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेशद्वारासमोरच सॅनिटायझर ठेवण्यात आले होते, तसेच महाविद्यालयाच्या परिसरातही फवारणी करण्यात आली होती.
प्राध्यापक, कर्मचारी मास्क परिधान करूनच महाविद्यालयात दाखल झाले होते. या शिवाय काही महाविद्यालयांमध्ये मास्क न घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच थांबवून मास्कचा वापर बंधनकारक केला होता.
मास्क, सॅनिटायझरचा फाटा
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने नागरिकांमधील भीती दूर झाली आहे. मात्र, महाविद्यालयात दाखल होताना विद्यार्थ्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आले असताना, अनेक विद्यार्थी विनामास्क महाविद्यालयात आल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
पहिल्याच दिवशी सर्व तासिका केल्या. आम्ही सर्व विद्यार्थी गणवेशात उपस्थित होतो. दहा महिन्यांनंतर आमचे शिक्षक, मित्र भेटल्याने आनंद झाला.
भागवत गलांडे, विद्यार्थी
दहा महिन्यांनंतर खऱ्या अर्थाने गुरू-शिष्यांची भेट झाली. त्यामुळे आनंद वाटला. आज प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन तासिका करता आल्याने समाधान वाटत आहे.
संतोष गरुड, विद्यार्थी
कोरोना कधी संपतो आणि कधी मी कॉलेजला जातो, असे वाटत होते. आज तो दिवस समोर आला. कॉलेजमध्ये प्रत्यक्ष वर्ग तासिका केल्याने समाधान वाटले.
ज्ञानेश्वर खराटे, विद्यार्थी