जिनिंगचे कार्यालय फोडून पावणे नऊ लाखांची रोकड, १३ किलो चांदी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 06:46 PM2021-07-22T18:46:33+5:302021-07-22T18:46:59+5:30
Robbery in manwat : कार्यालयात सर्वत्र पायाचे ठसे आणि सामान अस्तव्यस्त पसरलेले कर्मचाऱ्याला आढळून आले.
मानवत (परभणी ): शहरातील वळण रस्त्यावर असलेले राजेंद्र जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय चोरट्यांनी फोडून रोख 8 लाख 70 हजार व कार्यालयाच्या देवघरात ठेवलेले 14 किलो चांदीचे दागिने असा एकूण 15 लाख 70 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी ( दि. 22 ) पहाटे घडली. या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उद्योजक गिरीश कत्रुवार यांची शहराला लागूनच असलेल्या वळण रस्त्यावर राघवेंद्र जिनिंग आहे. जिनिंग परिसरातच एक इमारत असून या इमारतीत कार्यालय आहे. बुधवारी जिनिंगचे सर्व काम आटपून कार्यालय बंद करण्यात आले होते. आज सकाळी 8:30 वाजता कार्यालयात सर्वत्र पायाचे ठसे आणि सामान अस्तव्यस्त पसरलेले कर्मचाऱ्याला आढळून आले. त्याने याची माहिती गिरीश कत्रुवार यांना दिली. कत्रुवार यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश स्वामी, सपोनि भरत जाधव पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयाची तपासणी केली असता कपाटात ठेवलेले रोख आठ लाख 70 हजार रुपये व देवघरातील सात लाख रुपये किमतीच्या 13 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे डीव्हीआर ही सोबत नेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि साईनाथ पुयड यांच्या पथकाने घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.
गस्त वाढविण्याची मागणी
राजेंद्र जिनिंग मध्ये झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील बुद्ध नगर भागात मागील आठवडाभरापासून चोर येत असल्याची चर्चा आहे. या भीतीने नागरिकांनी रात्र गस्त सुरू केली आहे.