जिल्ह्यात ८७ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:39+5:302021-03-15T04:16:39+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून, रविवारी ८७ रुग्णांची नोंद झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूमुळे चिंता आणखीच वाढली ...
परभणी : कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून, रविवारी ८७ रुग्णांची नोंद झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूमुळे चिंता आणखीच वाढली आहे.
मागच्या एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट पसरली असून, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी आरोग्य विभागाला १ हजार २८२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार १४७ अहवालात ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे रॅपिड टेस्टच्या १३५ अहवालात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण ८७ रुग्णांची नोंद झाली असून, ३६ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात रुग़्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले असून, दररोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखीच वाढली आहे. जिल्ह्यात आता एकूण ९ हजार २७३ रुग्ण संख्या झाली असून, ८ हजार ५६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३४३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३६१ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील आय. टी. आय. हॉस्पिटलमध्ये ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयात ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६६ झाली आहे.
...या भागात आढळले रुग्ण
रविवारी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रुग्णांची नोंद झाली आहे. परभणी शहरात नवा मोंढा, यशोधननगर, सत्कार कॉलनी, युसूफ कॉलनी, रामकृष्णनगर, गजानन नगर, कल्याणनगर, लहुजीनगर, श्रेयसनगर, ऑडीटनगर, जिजामाता रोड, वकील कॉलनी, गणेशनगर, गोकुळनगर, गांधी पार्क, खासगी रुग्णालय, वांगी रोड, शिवरामनगर, सरस्वतीनगर, माळी गल्ली, विष्णूनगर, गव्हाणे रोड, शिवशक्ती बिल्डिंग, शाहूनगर, रायपूर, पोलीस क्वॉर्टर, खासगी रुग्णालय, दत्तनगर या वसाहतीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड, सेलू, पाथरी तालुक्यातही रुग्ण आढळले आहेत. हिंगोली, बीड जिल्ह्यातील परळी, औरंगाबाद येथील रुग्णांचीही परभणी जिल्ह्यात नोंद झाली आहे.