परभणी जिल्ह्यात ८८८ अतितीव्र कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 07:22 PM2018-06-27T19:22:23+5:302018-06-27T19:22:56+5:30
जिल्ह्यात १५ ते २५ जून दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ८८८ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून या बालकांवर ग्रामबालविकास केंद्रांमध्ये पोषण आहार आणि औषधी देऊन उपचार केला जात असल्याची माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली.
परभणी : जिल्ह्यात १५ ते २५ जून दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ८८८ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून या बालकांवर ग्रामबालविकास केंद्रांमध्ये पोषण आहार आणि औषधी देऊन उपचार केला जात असल्याची माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली.
जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते २५ जून दरम्यान जिल्हाभरात सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात १ लाख २५ हजार ५५१ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यामध्ये ८८८ बालके तीव्र कमी वजनाची कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. तर २०३० बालके मध्यम कमी वजनाची आढळून आली आहेत.
८८८ बालकांपैकी पैकी ५९५ बालकांवर १५४ अंगणवाड्यांमधील ग्राम बाल विकास केंद्रांवर उपचार केले जात आहेत. उर्वरित २९३ बालकांवर १ जुलैपासून १४० अंगणवाड्यांमध्ये उपचार केले जाणार आहेत. तीव्र कमी वजनाच्या बालकांना एका दिवसात ७ वेळा अमायलेजयुक्त पीठांचा विशिष्ट असा आहार दिला जाणार आहेत. त्या सोबत त्यांना विविध प्रकारची औषधीही दिली जाणार आहे. दोन महिन्यांमध्ये ही बालके सामान्य होतील, अशी माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली.
तीव्र कमी वजनाच्या बालकांना विशिष्ट आहार देण्यासाठी प्रत्येक अंगणवाड्यामध्ये प्रति बालक २५ रुपये प्रति दिन या प्रमाणे शासनाच्या वतीने निधी देण्यात आला आहे. कुपोषित बालकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पुरेपुर उपाययोजना केल्या जात असून यासाठी लोकप्रतिनिधींचाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे घोडके यांनी सांगितले.