दंड न आकारता सोडली जप्त केलेली ९ वाहने; शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:22 PM2020-08-21T19:22:38+5:302020-08-21T19:30:48+5:30
तहसील कार्यालयाने या वाहनांची रीतसर माहिती पाथरी उपविभागीय कार्यालयास पाठवली होती.
- सत्यशील धबडगे
मानवत : जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीची प्रकरणे गाजत असताना अवैध वाळू करताना जप्त केलेली ९ वाहने पाथरी येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्या लेखी आदेशावरुन दंड न आकारताच परस्पर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याने या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मानवत तालुक्यातील पार्डी, टाकळी, कोथाळा शिवारात असलेल्या दुधना नदीच्या पात्रातून वाळूमाफिया ७ मार्च रोजी १० ते १२ ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करीत होते. याची कुणकुण तहसील कार्यालयाच्या पथकाला लागताच पथक नदीकाठी दाखल झाले. या पथकाने नदीपात्रात वाळू खाली करून पळून जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या ४ ट्रॅक्टर ट्रॉल्या ताब्यात घेतल्या. तर एक ट्रॅक्टरचे हेडही ताब्यात घेतले होते. जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लावण्यात आली होती. तहसील कार्यालयाने या वाहनांची रीतसर माहिती पाथरी उपविभागीय कार्यालयास पाठवली होती.
या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ५ मे रोजी या वाहन मालकाना प्रति वाहन एक लाख रुपये दंड ठोठावून तो तातडीने भरण्यात यावा, अशी नोटीस बजावली होती; परंतु, नोटिसीचा काहीच परिणाम न झाल्याने २६ मे रोजी लेखी पत्र काढून दंडाची रक्कम ७ दिवसाच्या आत भरण्याचे आदेश दिले होते. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत वाहन मालकांनी ठोठावलेला दंड भरला नसतानाही तात्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांनी ३१ जुलै रोजी एका वाहनाचा तर उर्वरित दोन वाहनाचा ३ आॅगस्ट रोजी लेखी आदेश काढला. या आदेशात वाहन चालकाचे म्हणणे मान्य करण्यात येत आहे आणि जप्त केलेले वाहन तात्कळ सोडण्यात यावे, असे आदेश तहसील कार्यालयाला दिले.
या आदेशात वाहनमालकाने दंड भरला की नाही, याचा उल्लेखही केलेला नाही. तसेच दंड भरल्या संदर्भात उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नाही. कुंडेटकर यांचे आदेश मिळताच तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त करून लावण्यात आलेली वहाने दंड न भरताच १० व १२ आॅगस्ट रोजी सोडून देण्यात आली. या ३ वाहनासह आणखी ६ वाहने नियमबाह्य पद्धतीने सोडल्याचे समजते. यामध्ये १० जून रोजी वांगी येथे पकडलेले ३ ट्रॅक्टर व २ वर्षांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या ३ टिप्परचाही समावेश आहे.
गौण खनिज चोरीचा गुन्हा नोंद ; तरीही सोडून दिली वाहने
कुंभारी तांडा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून त्याचा साठा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० जून रोजी पहाटे साडेपाच वाजता कारवाई करीत सुमारे ५० ब्रास वाळूसह ३ ट्रॅक्टर जप्त केले होते. या प्रकरणात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन काही वाहने ताब्यात घेतली होती. ही वहाने सोडविण्यासाठी वाहन मालक न्यायालयात गेले होते. न्यायालयाने २४ जून रोजी महसूल विभागाने जरुरी असल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करून वाहने सोडून देण्याचे आदेश दिले होते. मात्र या वाहनांवर कोणत्याही प्रकाराचा दंड न आकारता ३ आॅगस्ट रोजी सोडून देण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना लेखी पत्राद्वारा प्राप्त झाले. या लेखी पत्रावर संबंधित वाहनचालकांनी दंड भरण्याची किंवा चलनाची माहिती नव्हती. न्यायालयाने सांगूनही वाहनांवर दंडात्मक कारवाई का केली नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणासंदर्भात उपविभागीय कार्यालयाकडे कोणतीच कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
नियमबाह्य पद्धतीने वाहने सोडली आहेत, असे कोणाला वाटत असेल तर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी अपील करावे. -डॉ.संजय कुंडेटकर, तत्कालीन उपविभागीय अधिकारी