परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:33 PM2018-02-20T19:33:23+5:302018-02-20T19:33:44+5:30

२०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६  टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे.

96% of the cases of Tadakalas and Daithana stations in Parbhani district solved | परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस

परभणी जिल्ह्यातील ताडकळस, दैठणा ठाण्यांचे ९६ टक्के गुन्हे उघडकीस

googlenewsNext

- प्रसाद आर्वीकर

परभणी : २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६  टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसताना आपले कर्तव्य चोख बजावणार्‍या या दोन्ही ठाण्यांनी जिल्ह्यात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात १९ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची नोंद घेऊन या गुन्ह्यांचा तपास करणे, आरोपी निश्चित करणे आणि या आरोपींना जेरबंद करून प्रकरण न्यायालयांकडे निकालासाठी सोपविण्याचे काम तपासी अधिकार्‍याचे असते. अनेक वेळा गुन्हे दाखल होतात. मात्र त्यातील आरोपी हाती लागत नाहीत. वर्षानुवर्षांपासून ही प्रकरणे खितपत पडतात आणि प्रकरणाचा संपूर्ण तपास न लागल्याने फिर्यादी अथवा पिडीत न्यायापासून वंचित राहतो. 

२०१७ या वर्षात जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली २ हजार ७९१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार २८८ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून पोलीस प्रशासनाने त्यांची कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या तपासाचा आढावा घेतला तेव्हा दैठणा आणि ताडकळस  या दोन पोलीस ठाण्यांची कामगिरी नजरेत भरते. दैठणा पोलीस ठाण्यात मागील एक वर्षात १०९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १०५ गुन्हे पोलिसांनी उघड केले असून या प्रकरणांचा तपासही पूर्र्ण झाला आहे. तर पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस  ठाण्यात ८३ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ८० गुन्हे उघड करण्यात आले आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघड करण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे. त्या खालोखाल पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षभरात ९० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ८६ गुन्ह्यांची उकल (९५ टक्के) तपासी अधिकार्‍यांनी केली आहे. बामणी पोलीस ठाण्याने देखील दाखल गुन्हे उघड करण्याची लक्षणीय कामगिरी केली आहे. या पोलीस ठाण्यात वर्षभरात ५९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५६ गुन्हे उघड करून प्रकरणे हातावेगळी केली आहेत. गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी करणारे हे सर्वच्या सर्व पोलीस ठाणे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे या ठाण्यांमध्ये काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील इतर अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी आदर्श ठरणारी आहे. 

नवामोंढा पोलीस ठाण्याची सुमार कामगिरी
वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यात नवामोंढा पोलीस  ठाण्याला अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षात नवामोंढा पोलीस  ठाण्यामध्ये २६० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी केवळ १५६ गुन्हे उघडकीस आले आहेत. नवामोंढा पोलीस ठाण्याने केवळ ६० टक्के गुन्हे उघड केले असून जिल्ह्यातील इतर ठाण्यांच्या तुलनेत मोंढा पोलीस ठाण्याची कामगिरी सुमार ठरली आहे.

कमी मनुष्यबळात अधिक काम
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये नेहमीच मनुष्यबळाचा अभाव असतो. अनेक पोलीस ठाण्यांना तर पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीही उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीतही ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी तपास कामी चोख भूमिका बजवली. सर्वाधिक यशस्वी तपास करणार्‍या दैठणा आणि ताडकळस पोलीस ठाण्यांचा कारभार तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे आहे. 
४विशेष म्हणजे पुरेशी वाहने, इंटरनेट, मोबाईलची रेंज व इतर तांत्रिक बाबी उपलब्ध नसतानाही या ठाण्यांनी आपली चुनूक दाखवून दिल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून त्यांचे कौतूक होत आहे. शहरी भागातील पोलिस ठाण्यांना मात्र त्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करावे लागणार आहे.

ग्रामीण भागातच तपासाला गती
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास उघड करण्याच्या कामात शहरी विभागातील पोलीस ठाणे मागे पडले आहेत. तर ग्रामीण विभागातील पोलीस ठाण्यांनी मात्र सरस कामगिरी करीत शहरी भागावर मात केल्याचे दाखवून दिले आहे. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याने ७९ टक्के, कोतवाली ठाण्याने ८३ टक्के, परभणी ग्रामीण ८६ टक्के, सेलू ७९ टक्के, मानवत ८० टक्के, पाथरी ८३ टक्के, जिंतूर ७८ टक्के, पूर्णा ७९ टक्के आणि गंगाखेड पोलीस ठाण्याने एका वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ८३ टक्के गुन्हे उघड केले आहेत. 

गुन्हे उघड करण्याची टक्केवारी

शहरी पोलीस ठाणे
नानलपेठ -         ७९ टक्के
नवामोंढा-        ६० टक्के
कोतवाली-        ८३ टक्के

परभणी ग्रामीण-     ८६ टक्के
सेलू-         ७९ टक्के
मानवत         ८० टक्के
पाथरी-         ८३ टक्के
जिंतूर-         ७८ टक्के
गंगाखेड         ८३ टक्के
सोनपेठ         ८९ टक्के
पूर्णा-         ७९ टक्के
पालम-         ८४ टक्के

ग्रामीण पोलीस ठाणे
दैठणा -         ९६
ताडकळस-     ९६
बोरी-         ८७
बामणी-         ९५
चारठाणा-     ८३
पिंपळदरी-     ९५

Web Title: 96% of the cases of Tadakalas and Daithana stations in Parbhani district solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.