लसींचा स्टॉक नसल्याने ९६ केंद्रे बंद; १ मेपासून काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:06+5:302021-04-29T04:13:06+5:30
परभणी : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २० हजार लसी आता संपल्या असून, २८ एप्रिल रोजी लसीअभावी ९६ केंद्रे प्रशासनाला बंद ...
परभणी : जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २० हजार लसी आता संपल्या असून, २८ एप्रिल रोजी लसीअभावी ९६ केंद्रे प्रशासनाला बंद ठेवावी लागली. त्यामुळे आता पुन्हा लसींची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढला तसा तुटवडा निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी कोविशिल्ड या लसीचे २० हजार डोस जिल्ह्याला मिळाले होते. ही लस दोनच दिवसांत संपली असून, २८ एप्रिल रोजी लसीअभावी १५० पैकी ९६ केंद्र प्रशासनाला बंद ठेवावे लागले. मंगळवारी शिल्लक राहिलेल्या लसींमधून ग्रामीण आणि शहरी भागातील केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दिवसभरात शिल्लक लस संपली असून, त्यामुळे लसीचा पुरवठा झाला नाही तर गुरुवारी सर्वच्या सर्व केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. शहरी भागात केवळ दुसऱ्या डोसच्या नागरिकांनाच लसीकरण झाले.
१ मे नंतर चे नियोजन काय
१ मे नंतर जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण खुले करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे १२ लाख नागरिक १८ वर्षांपुढील वयाचे आहेत. या नागरिकांसाठी जिल्ह्याला टप्प्या-टप्प्याने १२ हजार डोसेसची आवश्यकता आहे. प्रशासनाने लसीकरण केंद्र आणि आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. परंतु लसीचा पुरवठा होण्यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील ६ लाख ४८ हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्याला दिले होते. त्यापैकी १८ टक्के लसीकरण झाले.
आतापर्यंत ४५ वर्षांपुढील १ लाख १६ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात १ लाख ५ हजार २११ जणांनी पहिला, ११३७१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि ४५ वर्षांपुढील नागरिक असे मिळून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५२ हजार २१९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.