पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले
By राजन मगरुळकर | Updated: May 22, 2024 15:39 IST2024-05-22T15:34:50+5:302024-05-22T15:39:23+5:30
मागितलेली लाच खासगी इसमाने स्वीकारली; मानवत येथे एसीबी पथकाकडून सापळा

पोलिस उपनिरीक्षकासाठी लाच घेणारा इसम रक्कमेसह पसार; 'एसीबी'ने पाठलाग करून पकडले
परभणी : तक्रारदार यांचा जप्त केलेला वाळूचा ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता श्रेणी पोलिस उपनिरीक्षक वर्ग-३ याने लाचेची मागणी केली. या प्रकरणात ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम एका खासगी इसमाने पोलिस निरीक्षकाच्या सांगण्यावरून स्वीकारली. मात्र, त्यानंतर तो इसम रक्कम घेऊन पसार झाला. त्यानंतर एसीबी पथकाने मोठ्या शिताफीने शोध घेत त्याला ताब्यात घेतले. ही सापळा कारवाई मानवत येथे मंगळवारी सायंकाळी एसीबी परभणीच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य एक खासगी इसम अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गजानन रामभाऊ जंत्रे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक वर्ग तीन मानवत, असे आरोपी लोकसेवकाचे, तर मुंतसीर खान कबीर खान पठाण, असे लाच प्रकरणातील खासगी इसमाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, पोलिस उपनिरीक्षक जंत्रे यांनी तक्रारदार यांचे वाळूचे ट्रक व चालकास वाळूची वाहतूक करताना पकडले होते. त्यावरून मानवत ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता आरोपी लोकसेवक जंत्रे याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये मागितले. सदर रक्कम ही लाच असून, तक्रारदार यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १९ मे रोजी एसीबी कार्यालय परभणीकडे तक्रार दिली. त्यानंतर मंगळवारी मानवतला पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीदरम्यान जंत्रे यांनी त्यांच्या कक्षात तक्रारदार यांना पोलिस कस्टडी रिमांडच्या वेळी केलेल्या मदतीसाठीचे राहिलेले दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ते दहा हजार माफ करा, असे म्हटले.
यावरून न्यायालयात रिपोर्ट दाखल करण्यासाठी तडजोडीअंती ७० हजारांच्या लाचेची मागणी जंत्रे याने केली. यापैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये तेथे हजर असलेल्या आरोपी खासगी इसम मुंतसीर पठाण उर्फ बब्बूभाई याच्याकडे देण्यास सांगितले. उर्वरित २० हजार न्यायालयात रिपोर्ट सादर केल्यानंतर द्या, असे म्हणून लाच मागणी केली. पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी खासगी इसम पठाण याने दुचाकीवर बसून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम ५० हजार रुपये स्वीकारली. त्यानंतर पठाण लाचेच्या रकमेसह पळून गेले. यानंतर आरोपी पठाण याचा मानवतमध्ये शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेण्यात आले, तसेच आरोपी लोकसेवक जंत्रे यालादेखील ताब्यात घेण्यात आले.
घर झडतीत आढळली रक्कम
मानवत येथील त्यांच्या घराची झडती घेतली असता, यामध्ये नगदी रोख रक्कम ७४ हजार ५०० रुपये मिळून आले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली.