परतीच्या पावसाचा तडाखा; खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर तीनही धरणातून पूर्णापात्रात मोठा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:36 PM2024-10-19T12:36:18+5:302024-10-19T12:37:20+5:30
पूर्णा नदीवर तीन धरण असून सद्यस्थितीत हे तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत.
येलदरी वसाहत (परभणी) : परतीच्या पावसाने पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर या तिन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत असल्याने पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पूर्णपणे विभागाअंतर्गत करण्यात आले आहे.
खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून त्यातून 44 हजार 395 क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता शुक्रवारी पहाटे येलदरी धरणाचे 2 आणि सकाळी 9 वाजता 2 अशी 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. येलदरी धरण सद्यस्थितीत 100 % भरले असल्याने अतिरिक्त आवक झाल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरण्यासाठी संपूर्ण पावसाळा वाट पाहावी लागली. मात्र पावसाळ्याअखेर पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण 100% भरले. मात्र, पावसाचे प्रमाण वाढल्याने पूर नियंत्रण करण्यासाठी येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. विशेष म्हणजे, पूर्णा नदीवर तीन धरण असून सद्यस्थितीत हे तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर विसर्ग करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो. दरम्यान, परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा पूर्णा नदी परिसराला बसला आहे. यामुळे खडकपूर्णा धरण, येलदरी धरण व सिद्धेश्वर धरण या तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.