झेडपी शाळेत शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणी सहकारी शिक्षकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:20 PM2022-12-27T17:20:09+5:302022-12-27T17:20:43+5:30
सोमवारी सकाळी शाळेत आल्यानंतर कार्यालयात केली आत्महत्या
सोनपेठ ( परभणी ): गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने सोमवारी (दि. २६ ) सकाळी शाळेतच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहकारी शिक्षक साहेबराव राठोड ( रा. धारासुर तांडा ) विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सोनपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील शिक्षक विठ्ठल रत्नपारखे (45) यांनी शाळेतच सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मयताचा मुलगा पियुष रत्नपारखी याने दिलेल्या फिर्यादीवरून सहकारी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, साहेबराव राठोड याने सोमवारी विठ्ठल रत्नपारखी यांना अरेरावी केली. रत्नपारखी शाळेत येत असताना रूमणा पाटी येथे राठोडने शिवीगाळ करून थापडबुक्याने मारहाण केली. यानंतर विठ्ठल रत्नपारखे शाळेमध्ये आले. विद्यार्थ्यांना बाहेर पाठवत त्यांनी शाळेच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली.
मृत शिक्षकाचा मुलगा पियुष रत्नपारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव राठोड रा. धारासुर तांडा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंचक फड हे करत आहेत. घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी भेट दिली असून आरोपी साहेबराव राठोडला अटक करण्यात आली आहे.