अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; तिसऱ्या दिवशी पोलिसांकडून दोन्ही आरोपी जेरबंद
By ज्ञानेश्वर भाले | Published: September 7, 2022 03:18 PM2022-09-07T15:18:50+5:302022-09-07T15:19:16+5:30
जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून आरोपींना पकडले
परभणी : सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचाराच्या घटनेतील दोन आरोपीस पोलिसांनी तिसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी अकराला जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारात दुचाकीचा पाठलाग करीत पकडले. या ओरोपींना सेलू ठाण्यात आणण्यात आले असून यांची चौकशी वरिष्ठ पोलीस करीत आहेत.
सेलू शहरात खाणीचा मारोती परीसरातील शेतातून येतांना रस्त्यात दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून ५ सप्टेंबरला सकाळी साडेअकराला अल्पवयीन मुलगी व पिडीत मुलीचा मावसभाऊ मुलगा यास जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला होता. मुलास कौसडी फाटा रस्त्यावर सोडून देत पीडित मुलीस कोक शिवारात नेत जबरदस्तीने अत्याचार केला. याप्रकरणी पिडीताच्या आईच्या फिर्यादीवरून सेलू ठाण्यात मंगळवारी पहाटे साडेतीनला गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यापुर्वी बोरीचे सपोनि वसंत मुळे यांच्या पथकाला पीडित मुलगी कोक शिवारात सोमवारी सायंकाळी ५ वाजता आढळली. त्यानंतर पीडितेस सेलूत आणण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी सेलूत ४ तर जिंतूर तालुक्यात ३ पथक तयार केले. आरोपींना पकडणे यासाठी पोलिसांनी दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस केला. पण मंगळवारी पोलीस यंत्रणेला यश आहे नाही. मात्र बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास राजेगाव परिसरात रस्त्यावर एक दुचाकी जोरात धावतांना या भागात तपासणी पथकातील पोलीस कर्मचारी पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत यांना दिसली.
त्यांनी या दुचाकीचा पाठलाग सुरू केला तेव्हा या आरोपींची दुचाकी राजेगावातून भरधाव वेगाने पांढरगळाकडे जातांंना तेथील युवकांनी पाहिली. यावेळी पोलिसांना सहकार्य करीत पळणाऱ्या दोन्ही आरोपींना दुचाकीसह पकडले. याबाबतची माहिती पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना सेलू ठाण्यात आणण्यात आले. या दोन्ही आरोपींची चौकशी पोलीस अधिक्षकांसह पोलस अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून त्यांची मच्छिंद्र घुले, तुकाराम घुले (दोघेही रा.मानमोडी ता.जिंतूर) आहे. या आरोपींच्या कबुली जवाबानंतरच घटनेचा उलगडा होऊ शकतो.