अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास
By राजन मगरुळकर | Published: August 30, 2022 05:41 PM2022-08-30T17:41:08+5:302022-08-30T17:46:02+5:30
अधिकारी, पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांचा राबता सोबत असतानाही जिल्हाधिकारी गोयल यांना ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक दिसून आले.
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात एक ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातून मंगळवारी आले होते. मात्र, कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीमुळे ते प्रवेशद्वाराच्या लगत पायऱ्याजवळ बराच वेळ बसून राहिले. त्यामुळे या वृध्दाची समस्या कोण एकणार ? असा प्रश्न होता. मात्र, ही समस्या चक्क स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीच ऐकली. बैठक आटोपून कार्यालयाबाहेर पडताना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना हे ज्येष्ठ नागरिक दिसले. त्यांनी त्यांची विचारपूस केली, समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना सुध्दा केल्या. हा प्रकार मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास घडला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त विविध विभागांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. ही बैठक दुपारी १ ते ४ या वेळेत झाली. विविध अधिकारी तसेच स्वतः जिल्हाधिकारी आंचल गोयल या बैठकीत हजर होत्या. ही बैठक संपताच सगळ्या अधिकाऱ्यांची पावले कार्यालयाबाहेर वळली. अधिकारी, पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांचा राबता सोबत असतानाही जिल्हाधिकारी गोयल यांना ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक दिसून आले. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यंत्रणा बाजूला सारुन प्रवेशद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकाची विचारपूस केली. या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकून घेतली. त्यांच्या हातातील निवेदनही स्विकारले. त्यावरील मजकूर पाहून संबंधित विभागाला काम सुपूर्द करत सूचना केल्या. पडताळणी करून प्रशासनाला त्यांनी काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
साधेपणाचे अनेकांनी केले कौतूक
कामानिमित्त आलेल्या व बराच वेळ ताटकळत बसलेल्या जेष्ठ नागरिकाला जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमुळे मोठा आधार मिळाला. विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी हा प्रकार अनुभवला. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाचे कौतूक केले. याची चर्चा काही वेळ कार्यालयाच्या परिसरात रंगली होती.