हळदीला येताना रस्त्यात अडवले; लग्नाच्या एकदिवस आधी इस्रोच्या वैज्ञानिकावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:32 AM2023-05-10T11:32:12+5:302023-05-10T11:32:44+5:30
वैज्ञानिकावर हल्ल्याची आठवड्यात दुसरी घटना
परभणी : नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जात असताना परभणी-वसमत महामार्गावर राहाटी नदी पुलाजवळ चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणाने हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पंकज प्रकाश कदम असे जखमी झालेल्या वैज्ञानिकाचे नाव आहे. ते श्रीहरी कोट्टा येथे कार्यरत आहेत. पंकज कदम हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील रहिवासी आहेत. पंकज यांचा विवाह परभणीतील एका मुलीसोबत ठरला होता. या लग्नासाठी नवरदेव पंकज कदम व त्याचे कुटुंबीय हळदीला येत होते. परभणी-वसमत महामार्गावर राहाटी- नांदगाव जवळ सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्यांचे वाहन आले असता पुलावर दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आणून उभ्या केल्या. यावेळी पंकज कदम यांनी वाहन थांबविले. काही समजण्याच्या आत हल्लेखोरांनी पंकज यांच्यावर हल्ला केला. त्यांना राॅडने जबर मारहाण केली. या घटनेनंतर दुचाकीवर बसून हल्लेखोर पसार झाले. जखमी पंकज यांना उपचारास परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणीचे अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार गणेश चव्हाण यांनी दवाखान्यात जाऊन भेट दिली तसेच जखमींची विचारपूस करून चौकशी केली.
इस्त्रोशी संबंध नाही
या प्रकरणामध्ये पूर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे व पूर्णा पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. इस्त्रोशी निगडित कोणत्याही प्रकरणातून हा हल्ला झालेला नाही.
- यशवंत काळे, अप्पर पोलिस अधीक्षक, परभणी.
नांदेडमध्येही झाली होती अशीच घटना
चार ते पाच दिवसांपूर्वी नांदेड येथे त्यांच्यावर अशाच हल्ला झाला होता. यानंतर पुन्हा हा प्रकार सोमवारी घडला आहे. मात्र, यातील कारण पुढे आले नाही. मंगळवारी उपचारानंतर पंकज कदम हे गावाकडे परतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.