भर वस्तीत विद्युत रोहित्राला लागली आग, परभणीच्या कडबी मंडी भागातील घटना
By राजन मगरुळकर | Published: May 25, 2024 03:40 PM2024-05-25T15:40:22+5:302024-05-25T15:40:37+5:30
परभणी शहरातील गव्हाणे चौक मोंढा परिसराकडे जाणाऱ्या भागात कडबी मंडी हा भाग आहे. या ठिकाणी महावितरणच्या एका विद्युत रोहित्राला शनिवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आग लागली.
परभणी : शहरातील कडबी मंडी परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या एका विद्युत रोहित्राला आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती परभणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला त्वरित देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विद्युत रोहित्राला लागलेली आग अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा फवारा करण्यात आला. अखेर काही वेळाने रोहित्राने घेतलेला पेट शांत झाला. यानंतर रोहित्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
परभणी शहरातील गव्हाणे चौक मोंढा परिसराकडे जाणाऱ्या भागात कडबी मंडी हा भाग आहे. या ठिकाणी महावितरणच्या एका विद्युत रोहित्राला शनिवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आग लागली. ही माहिती परिसरातील नागरिकांनी त्वरित मनपा अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, फायरमन सर्जेराव मुंडे, समी सिद्दिकी यांच्यासह चालक दाखल झाले. फॉगिंग मशीन आणि पाण्याच्या फवाऱ्याने सदरील आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. या घटनेत कोणतीही जीवित, वित्तहानी झाली नाही. मात्र, महावितरणच्या रोहित्राचे नुकसान झाले आहेत. यामुळे काही वेळ परिसरातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. एकीकडे शहरातील तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे.