परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा

By राजन मगरुळकर | Published: February 15, 2024 07:51 PM2024-02-15T19:51:14+5:302024-02-15T19:51:26+5:30

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा, कृषी प्रदर्शनी

A gathering of farmers and experts from six states at the Agricultural University in Parbhani | परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा

परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी आत्मा, कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन २१,२२, २३ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात केल्याची माहिती कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके, जिल्हा माहिती अधिकारी अरूण सुर्यवंशी आदींसह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ.इन्द्र मणि म्हणाले, मेळाव्यात पश्चिम भारताच्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा यासह दीव-दमन, दादरा- नगर हवेली येथील शेतकरी, कृषी तज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपनी, कृषि अधिकारी, विस्तारक आणि कृषि उद्योजक सहभागी होणार आहेत. मेळाव्यास देशातील आणि राज्यातील मंत्री महोदयांना आमंत्रित केले आहे. मेळाव्याचा मुख्य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्र, शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद व तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याचे उदघाटन २१ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता होणार आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे हे २३ फेब्रुवारीला समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी असुन उदघाटन कार्यक्रमास राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. कृषि मेळावा, प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ.इन्द्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले.

दोनशेहून अधिक दालन राहणार
शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी माध्यमातुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या २०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे. यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्दती, पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील.

Web Title: A gathering of farmers and experts from six states at the Agricultural University in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.