विहीर खोदकाम करतांना लोखंडी टोपले डोक्यात पडून मजुराचा मृत्यू
By ज्ञानेश्वर भाले | Updated: March 1, 2024 12:58 IST2024-03-01T12:57:47+5:302024-03-01T12:58:13+5:30
सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव शिवारातील शुक्रवारी सकाळची घटना

विहीर खोदकाम करतांना लोखंडी टोपले डोक्यात पडून मजुराचा मृत्यू
सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील गुगळी धामणगाव शिवारात विहीर खोदकाम दरम्यान लोखंडी टोपले डोक्यात पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठला समोर आली. रावसाहेब मोकींदा मांडे (३५, रा.मानोली ता. मानवत) असे मृत मजुराचे नाव आहे.
गुगळी धामणगाव परिसरात मजुरांकडून दत्तराव किशनराव डख यांचे नवीन विहीरीचे खोदकाम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी खोदकाम सुरू असतांना विहीरीतील दगड, मातीवर घेऊन जाणारे लोखंडी टोपले विहीरीत काम करीत असलेले मजूर रावसाहेब मोकींदा मांडे यांच्या डोक्यात पडले. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सेलू पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाणग, कोपणार हे घटनास्थळी पोहचले. पंचंनामा झाल्यानंतर मृतदेह शेवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मानोली गावावर शोककळा पसरली आहे. मयत रावसाहेब मांडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.